नागपूर : जुना सुभेदार लेआऊट शारदा चौक येथील इम्युनिटी बुस्टर हेल्थ येथे बनावट औषध विकणाऱ्या एका क्लबवर धाड टाकून येथून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करत क्लबचे मालक सुमीक मलिक यांच्यावर २५ हजार रुपयाचा दंड ठोठवला. उपद्रवी शोध पथकाने ही कारवाई केली.

शारदा चौक येथील एक छोट्याशा खोलीत  करोना प्रतिबंधक इम्युनिटी बूस्टर काढा व औषध दिले जात असल्याची माहिती मंगळवारी  रात्री महापौरांना मिळाली होती. क्लबचे सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर  मुखपट्टी लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता.

सकाळी महापौरांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, छोट्याशा ४५० वर्ग फुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मुखपट्टी घातलेले नव्हते. महापौरांनी अशा प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या संस्थेच्या विरुध्द सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मंगल कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर कारवाई

उपद्रवी शोध पथकाने बुधवारी मंगल कार्यालयांसह २० व्यावसायिक प्रतिष्ठानावर कारवाई करून २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे. बुधवारी हाय ऑन हॉटेल भगवाघर, हेल्थ इम्युनिटी, शारदा चौक, गबरु टी स्टॉल गणेशपेठ, ज्योती कॉस्मेटिक गणेशपेठ, मीरा वाईन शॉप, ट्रेंड एम्प्रेस मॉल शुक्रवार तलाव, काचोरे लॉन मनीष नगर, तुलसी हॉटेल वंजारी नगर, रिलायन्स फ्रेशन मनीषनगर, टाइम झोन ट्रीलियम मॉल मेडिकल चौक, एसएमई वाइन शॉप मेडिकल चौक, आयडल अकादमी आशीर्वादन नगर, चानक्य लायब्ररी भांडे ले आऊट, अभिनंदन रेस्टॉरंट नंगा पुतळा, राधा कृष्ण सेलिब्रेशन, खोब्रागडे लॉन सिद्धार्थनगर, गोत्रा लॉन टेका नाका, मंगल मंडप कडबी चौक, राज सेलिब्रेशन लॉन गोरेवाडा रोड या प्रतिष्ठानावर कारवाई केली. गोत्रा लॉनवर तिसऱ्यांदा कारवाई करत ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.