बदलत्या वातावरणाचा परिणाम स्थलांतरित पक्ष्यांवरही झाला असून ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही. त्यांच्या आगमनासाठी वातावरण प्रतिकूल असले तरीही पाणपक्ष्यांसाठी अधिवास आणि खाद्यान्नाची उपलब्धता पोषक आहे. त्यामुळे राज्यावरील पावसाचे मळभ दूर झाले तर स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला नक्कीच सुरुवात होईल, अशी अपेक्षा पक्षी अभ्यासकांना आहे.

थंडीत गोठणारी जलाशये आणि खाद्यान्नाची अनुपलब्धता तसेच जगण्यासाठी संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी सुरक्षित जागा यामुळे देशविदेशातून भारताच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित पक्षी मोठय़ा संख्येने येतात. भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप तसेच मध्य आशिया, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, लडाख, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागातून पक्षी येतात. त्यापैकी महाराष्ट्रात प्रामुख्याने ६४ प्रकारचे पक्षी स्थलांतरण करून येतात. यावर्षी अजूनपर्यंत महाराष्ट्रात स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या नोंदी नाहीत. मात्र, कृष्णथिरथिरा आणि निलय या दोन प्रजातीचे रानपक्षी आले आहेत आणि पक्षी अभ्यासकांना त्यांचे दर्शनही झाले आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पाणपक्ष्यांच्या आगमनाला अजून सुरुवात झालेली नाही. ऑक्टोबर हा त्यांच्या स्थलांतरणाचा काळ आणि यावर्षी पावसाळी वातावरण सोडले तर पाणी आणि खाद्य या स्थलांतरित पक्ष्यांसाठी आवश्यक गोष्टी मोठय़ा प्रमाणात आहेत. मागील तीन-चार वर्षे स्थलांतरित पक्ष्यांना पाणी आणि अन्नासाठी फरफट करावी लागली. त्यामुळेही त्यांचे येण्याचे प्रमाण कमी झाले होते. अमरावती, नागपूर हे स्थलांतरित पक्ष्यांच्या आवडीचे ठिकाण आहे. मात्र, या जिल्ह्यतील जलाशये कोरडी असल्याने या पक्ष्यांनी पाठ फिरवली होती. यावेळी मात्र सर्व लहान-मोठे जलाशय भरलेले आहेत.  सध्यातरी हवामान खाते सातत्याने पावसाचे इशारे देत आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनावर दिसून येत आहे.

महाराष्ट्रासारखे वातावरण इतरही राज्यांमध्ये असेल तर पक्ष्यांच्या एकूणच स्थलांतरणावर त्याचा  परिणाम होईल. मात्र, हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रापुरते असेल तर अंशत: त्यांच्या आगमनावर परिणाम होईल. कारण स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश या सीमा माहिती नाहीत. ते भारतभर पसरतात.

– यादव तरटे पाटील, पक्षी अभ्यासक.