राजा बुंदेला यांचे टीकास्त्र, नवराज्य निर्माण संघाचे अधिवेशन

नवराज्य निर्माण महासंघाच्या बॅनरखाली देशात अनेक आंदोलने सुरू आहेत. त्यामुळेच मध्यंतरी देशात ४ नवीन राज्यांची निर्मिती झाली. ही राज्ये मिळताच संबंधित राज्यांतील नेत्यांनी स्वतची स्वप्नपूर्ती झाल्याचे बघत इतर राज्यांच्या आंदोलनाकडे मात्र पाठ फिरवली, अशी टीका नवराज्य निर्माण महासंघाचे कार्याध्यक्ष राजा बुंदेला यांनी केली. संघाच्या अधिवेशनात त्यांनी थेट चंद्रशेखर राव, शिबू सोरेन यांच्यासह इतर नेत्यांना लक्ष्य केले.

देशात विदर्भ, बोडोलॅन्ड, बुंदेलखंड, गोरखालॅन्ड, कुकीलॅन्ड, पूर्वाचल, ट्विपरलॅन्ड आणि इतर अनेक लहान राज्यांची स्थानिक नागरिकांकडून मागणी  होत आहे. या मागणीला पाठबळ देऊन दिल्लीत दबाव निर्माण करण्यासाठी नवराज्य निर्माण संघाची १९९५ मध्ये स्थापना झाली. त्यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मधुकर दिघे होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संघाच्या अध्यक्षपदी शिबू सोरेन, अजित सिंग, चंद्रशेखर राव, अमर सिंग आणि देशाच्या विविध भागातील दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, संघाने उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा या चारही लहान राज्यांच्या आंदोलनाला पाठिंबा  दिल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारनेही आंदोलनापुढे झुकत या नवीन राज्यांची निर्मिती केली. परंतु त्यानंतर स्वतची स्वप्नपूर्ती झाल्याचे बघत तेथील नेत्यांनी इतर राज्यांच्या आंदोलनाकडे मात्र पाठ फिरवली. या प्रकाराने नवीन राज्य निर्माण न झालेल्या भागातील नागरिकांवर अन्याय होत आहे. संघात सहभागी काही नेत्यांनी त्यांची लहान राज्यांची मागणी मान्य होत नसल्याचे बघत केंद्र सरकारशी संगनमत करून वेगळी राजकीय चूल मांडली, असा आरोपही बुंदेला यांनी केला. याप्रसंगी नवराज्य निर्माण संघाचे अध्यक्ष श्रीहरी अणे, ऑल बोडो स्टुडन्स युनियनचे प्रमोद बोरो, कुसूम स्वर्गीयारी, लॉरेन्स इशालारी, राकेश बोरो, धिरेन बोरो, रोबोई यउकिप, हाऊपो गागरे, स्टॅलेन एंगटी, प्रमोद दाईमारी, पंकजकुमार जयस्वाल आदी देशाच्या विविध भागातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

विदर्भवादी नेत्यांची दांडी

विदर्भ राज्य आघाडीकडून नागपूरला नवराज्य निर्माण संघाचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी देशाच्या विविध भागातील लहान राज्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. अधिवेशनात विदर्भाकरिता आंदोलन करणाऱ्या सर्वच नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र अनेक नेत्यांनी अधिवेशनाला दांडी मारली.