आंतरराष्ट्रीय महासचिव चंपत राय यांचे मत

अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराची जागा देवाची मालमत्ता आहे. त्यावर श्रीराम मंदिरच उभारले जाईल. या जागेचे विभाजन विश्व हिंदू परिषदेकडून मान्य केले जाणार नाही. न्यायालयात सुरू असलेला वाद हा जागेच्या विभाजनाचा नव्हता, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव चंपत राय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारपासून आयोजित बैठकीची माहिती त्यांनी यावेळी दिली. रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभारण्याच्या विचाराने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. परंतु संस्थेचा हा एकच उद्देश नसून संपूर्ण हिंदू समाज जगभरात ताठ मान करून चालावा हाही हेतू होता. त्यादृष्टीने विहिंपकडून विविध कार्ये देशभरात सुरू आहेत. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्याकरिता हिंदू समाजाला संपूर्ण जागेचा ताबा हवा. त्यावर आखाडा, राम मंदिराकरिता जागा आणि मशीद अशा तीन विभागात जागेच्या विभाजनाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध आहे. रामजन्मभूमीच्या जागेबाबतचा  निर्णय प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निर्णयाने देशाची शांतता भंग होत असल्यास संसदेने हस्तक्षेप करून कायदा करून अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हिंदूचे प्रश्न समजणारे सरकार आहे. या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यातच विहिंपकडूनही विविध प्रकारे सामान्यांमध्ये जनजागृतीच्या मदतीनेही श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरासह हिंदूंच्या जनजागृतीकरिता विविध कामे होत असल्याचे चंपत राय म्हणाले. पत्रकार परिषदेला एकल अभियानाचे अध्यक्ष बजरंगलाल बागला, विहिंपचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन उपस्थित होते.

कुटुंब संख्येवर विचार करावा लागेल

विश्व हिंदू परिषद विविध संतांकडून हिंदू समाजाच्या विकासाकरिता मार्गदर्शन घेते. प्रत्येक संतांचा विचार वेगवेगळा असू शकतो. नागपूरला नुकतेच वासुदेवानंद सरस्वती यांनी देशात हिंदूची संख्या कमी होत असून प्रत्येक हिंदूू कुटुंबीयांनी दहा अपत्ये जन्माला घालण्याची गरज व्यक्त केली, या मताशी विहिंप सहमत नसले तरी हिंदू कुटुंबाची संख्या किती असावी, लहान कुटुंबाचे अस्तित्व काय असते, यावर विचार करण्याची गरज आहे, असेही चंपत राय म्हणाले.

संस्कार, शिक्षण, आरोग्यावर आजपासून मंथन

विश्व हिंदू परिषदेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि गव्हर्निंग काऊंसिलची संयुक्त बैठक तब्बल ३२ वर्षांनी नागपूरला गुरुवारपासून होत आहे. बैठकीत हिंदूंवर होणारे आक्रमण, अन्याय, हिंदूंचे रक्षण कसे करावे यावर मंथन होईल. भारतातील बहुतांश मुस्लिम व पारशी समाजाचे पूर्वज हे हिंदू संस्कृतीशी संबंधित असून त्यांना याची आठवण कशी द्यावी यावरही याप्रसंगी मंथन होईल. या कामाकरिता प्रसंगी २५ ते ३० वर्षेही लागण्याची शक्यता आहे. परिषदेत समान कायदा, एकल विद्यालयाच्या वतीने देशभरातील गावांपर्यंत शिक्षणासह संस्कार कसे पोहोचवता येईल, यावरही चर्चा होणार आहे.