पहिल्याच दिवशी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

नागपूर : शतकोत्तर वर्षांत पदार्पण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक गोंधळाने विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे पितळ उघडे पडले. संकेतस्थळावरून सकाळी ८ वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी दोन वाजतापर्यंतही सुरू न होऊ शकल्याने अखेर विद्यापीठावर पहिल्याच दिवशी परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली.

नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांना आज गुरुवारपासून प्रारंभ होणार होता. सकाळी आठ ते अकरा या वेळेत बी.कॉम., बीबीए आणि बी.एस्सी. गृहअर्थशास्त्र विषयाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा होत्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ‘तांत्रिक अडचण’ दाखवण्यात आली. अनेक वेळा लॉगिंग करण्याचा प्रयत्न करूनही संकेतस्थळच उघडत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यापीठाकडून कुठलाही मदत क्रमांक दिला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये  गोंधळ निर्माण झाला. सकाळी ८ ते ११ वाजता दरम्यानची परीक्षा दुपारी दोन वाजतापर्यंत सुरूच होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या सत्रात सकाळी ११.३० ते अडीच या वेळेत होणाऱ्या बी.एस्सी. आणि बी.ई.च्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा संकेतस्थळाचा हाच अनुभव आला. विद्यापीठाच्या या ढिसाळ नियोजनाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात पालकांनी रोष व्यक्त केला आहे. दोन सत्रातील परीक्षा सुरू न झाल्याने अखेर विद्यापीठाने गुरुवारच्या सर्व सत्रातील परीक्षा स्थगित करीत या परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्याचा निर्णय घेतला. प्रशासन विद्यार्थीभिमुख असून विद्यापीठात डिजिटल क्रांती घडवण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाने परीक्षेतील गोंधळावर चुप्पी साधली आहे. परीक्षा का होऊ शकली नाही, तांत्रिक गोंधळ काय होता, यावर स्पष्टीकरण न देता केवळ परीक्षा स्थगित करण्याचे पत्र काढले आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

परीक्षेच्या खर्चावर कात्री का?

आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या नागपूर विद्यापीठाकडे ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दर्जेदार कंपन्या इच्छुक होत्या. मात्र, यातील काही कंपन्यांच्या परीक्षेचे दर अधिक असल्याचे कारण पुढे करून त्यांना बाहेरचा मार्ग दाखवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, परीक्षेचे शुल्क हे विद्यार्थी देतात. विद्यापीठाची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. असे असतानाही परीक्षेसारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी प्रशासनाने खर्चाचा विचार का केला, चार महिन्यांपासून नवीन कंपनीसाठी निविदा प्रक्रिया का राबवली नाही ? असे  सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

चार महिन्यांपासून प्रशासन सुस्त

नोव्हेंबरमध्ये झालेल्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक गोंधळ आणि उणिवांमुळे नागपूर विद्यापीठ चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर चार महिन्यांनी हिवाळी परीक्षांना सुरुवात होत असतानाही या कालावधीमध्ये प्रशासनाने ऑनलाईन परीक्षेच्या दिशेने कुठलीही ठोस तयारी केली नाही. म्हणूनच विद्यापीठाला आजचा दिवस बघावा लागला, असे आरोप आता होत आहेत.

विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास होतोय. या संपूर्ण गोंधळाची कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल. प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी व ताबडतोब नव्याने निविदा काढाव्या.

– विष्णू चांगदे, सदस्य, व्यवस्थापन परिषद.