|| देवेश गोंडाणे

विद्यापीठाच्या वसतिगृहामधील प्रकार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गांधीनगरमधील मुलींच्या वसतिगृहामध्ये शिस्तीच्या अतिरेकी अंमलबजावणीमुळे विद्यार्थिनींना येथे राहणे अवघड झाले आहे. प्रवेशापासून ते पोशाखापर्यंत आणि रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी घालून दिलेले नियम विद्यार्थिनींसाठी दैनंदिन कामकाजात आणि अभ्यासातही अडथळा ठरत आहेत.

काही दिवसांआधी एक विद्यार्थिनी पुरुषी पोशाख घालून आली असता तिला नको त्या शब्दात बोलून प्रवेश नाकारण्यात आल्याचे येथील मुलींनी सांगितले. वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलींना गुडघ्यापर्यंत लांब असलेला रात्रीचा पोशाख घालण्यावर र्निबध घातले जात आहेत. मुलींचे असे कपडे वऱ्हांडय़ामध्ये वाळताना जरी दिसले तरी ते परस्पर काढून फेकून दिले जातात. अशा विद्यार्थिनीवर शिस्त मोडल्याच्या नावाखाली दंड आकारला जात असल्याचे येथील मुलींनी सांगितले. रोज रात्री ११ वाजता ध्वनिक्षेपकावर घोषणा करून दिवे बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात. कुणाला अभ्यास करायचा असला व त्यांनी जास्तवेळ वीजदिवे सुरू ठेवले तर त्या दंडास पात्र ठरतात. येथील विद्यार्थिनी  पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आहेत. अनेकांना रात्री अभ्यास असतो, प्रात्यक्षिक, लेखन पूर्ण करायचे असते. मात्र, वसतिगृह अधीक्षकांनी शिस्तीच्या नावाखाली अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप येथील विद्यार्थिनींनी केला आहे. वसतिगृहामध्ये विदर्भाच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनींची मोठी संख्या आहे. त्यामुळे त्यांना बाहेर खासगी खोली करून राहणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. रात्री सातच्या आत परत येण्याचा नियमाचे विद्यार्थिनींही स्वागत केले आहे. मात्र, यायला एका मिनिटाचा जरी उशीर झाला तरी दंड आकारणे, वऱ्हांडय़ामध्ये थोडे मोठय़ाने हसताना दिसले तरी विद्यार्थिनींना आर्थिक दंड ठोठावणे, ही अमानवीय वागणूक असल्याचा आरोपही येथील विद्यार्थिनींनी केला आहे.

विद्यार्थिनी म्हणतात..

मी मागच्या वर्षी वसतिगृहात राहिली. मात्र, शिस्तीच्या नावाखाली केवळ मन:स्ताप सहन केला. आम्हाला शिस्त नको असे मुळीच नाही. मात्र, अधीक्षक मॅडमकडून त्याचा अतिरेक होतो. साधे हसताना दिसले तरी  दंड आकारला जात असेल तर ही कसली शिस्त?  या जाचामुळे मी एका वर्षांतच प्रवेश रद्द केला. माझ्यासोबतच्या दोन मुलींना यावर्षी प्रवेश मिळाला. परंतु त्यांनी अधीक्षकाच्या धाकामुळे प्रवेशच घेतला नाही.       – मनीषा वाढे,

दोन वर्षे कसेबसे वसतिगृहामध्ये काढले. आमच्या अधीक्षक शिस्तप्रिय आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र, शिस्तीच्या नावावर केवळ अतिरेक कुणी कसा सहन करेल? पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी येथे राहतात. मात्र, त्यांना येथे कसलेही स्वातंत्र्य नाही. ज्याप्रमाणे नियम सांगितले जातात, त्या तुलनेत सुविधा मात्र दिल्या जात नाही. – प्रिया कराडे,

शिस्तीची नियमावली..

  •  रात्री ११ वाजता वीजदिवे बंद करण्याचे र्निबध.
  •  रात्रीचा पोशाख घालण्यावर बंदी.
  •  दहा दिवस जेवण केले तरी महिन्याभराच्या शुल्काची आकारणी.
  •  दुसऱ्या मुलींच्या खोलीत जाण्यास मज्जाव.