विजेच्या उपकरणाने शुद्ध केलेल्या पाण्यातही अल्प खनिज; किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीचा अभ्यास

पाणी हे जीवन आहे. प्रत्येक व्यक्ती व प्राण्यांच्या आरोग्यावर पाण्याचा परिणाम होतो. नागपूर जिल्ह्य़ातील पाण्याची स्थिती जाणून घेण्याकरिता कामठी येथील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने एका प्रकल्पावर काम करण्यात आले गेले. त्यात नागपूर व कामठी येथील वेगवेगळ्या ७ प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यात बाटलीबंदसह विजेच्या उपकरणावर शुद्ध झालेले पाणी सतत पिल्यास हाडांचा आजार संभावत असल्याचे पुढे आले. या प्रकल्पाची नोंद वैद्यकीय जर्नलमध्ये लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

प्रकल्पांतर्गत नागपूर व कामठी येथील सात वेगवेगळ्या प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचे प्रत्येकी बारा नमुने घेऊन कामठीतील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रयोगशाळेत तपासले गेले. अहवालात नावाजलेल्या काही कंपन्यांचे बाटलीबंद पाण्यासह विजेच्या उपकरणावर गाळून शुद्ध झालेल्या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे खनिजांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे पुढे आले आहे. हे पाणी सतत जास्त वर्षे पिल्यास संबंधित व्यक्तीला हाडांसह विविध प्रकारचे आजार जडण्याची दाट शक्यता असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून पुढे आला आहे. त्यामुळे पिण्याचे शुद्ध व आरोग्यवर्धक पाणी म्हणायचे कशाला, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.

संशोधनावर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नमिता डेहरीया, प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवी कलसाइत यांच्या वतीने काम करण्यात आले. संशोधनाकरिता नागपूर व कामठी येथील वेगवेगळ्या भागातील विहिरींचे पाणी, बोअरवेलचे पाणी, कन्हान नदीचे पाणी, बाटलीबंद पाणी, अ‍ॅक्वागार्डचे पाणी (उपकरणावर फिल्टर पाणी), रिव्हर ऑसमॉसीसचे पाणी (उपकरणावर फिल्टर पाणी), नागपूर महापालिकेच्या नळातून येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. नमुन्यांची ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड (बीआयएस)च्या निकषांप्रमाणे कामठीच्या फार्मसी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यावर सगळ्या पाण्यातील अ‍ॅसीड, आम्ल, गढूळता, कॅल्शियम व जडपणा, चव, वासासह खनिजे इतर बाबी बघितल्या गेल्या. तपासणीत नदीच्या पाण्यात मासोळीयुक्त, तर विहिरीच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर क्लोरीनचा वास असल्याचे, तर मोठय़ा कंपनीच्या बाटलीबंद व ब्रँडेड विजेच्या उपकरणावर गाळण्यात आलेल्या पाण्यात कॅल्शियम, कॉपर, सल्फेट, मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. या खनिजांची शरिरात कमतरता असल्यास माणसाला विविध प्रकारचे आजार जडण्याची शक्यता पुढे आली. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मानवी हाडांचा त्रास होते. त्यामुळे हाडातील ठिसूळता वाढते, तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मानवात चिडचिडपणा, हात व पायात मुंग्या येण्याचा त्रास होते. क्लोराईडच्या कमतरतेने मज्जासंस्थांशी संबंधित आजारांसह पक्षघात होण्याची शक्यता असते. तांब्याच्या कमतरतेने डोळ्यांशी संबंधित आजार संभावतात. तपासणीत नागपूर महापालिकेचे पाणी इतरांच्या मानाने सगळ्या तपासणीत पास झाले, हे विशेष.

संशोधनाच्या माध्यमातून या प्रकल्पात विजेच्या उपकरणाने गाळलेल्या ७० टक्के पाण्यात ३० टक्के नागपूर महापालिकेचे पाणी एकत्र करून तपासले गेले. त्यात पाण्यातील खनिजांची मात्रा चांगली असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले. हे पाणी पिण्याकरिता उत्तम असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

chart-1

शरीराला खनिज आवश्यक -डॉ. रवी कलसाइत

कामठीतील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने नागपूर व कामठी येथील सात प्रकारच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. बाटलीबंद व विजेच्या उपकरणात गाळलेल्या पाण्यात खनिजे कमी असल्याने मानवाला विविध आजार होण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष पुढे आला. शरिराला खनिजे आवश्यक असल्याने त्यासाठी नागपूर महापालिका व विजेच्या उपकरणात गाळलेल्या पाण्याला एकत्र करून पिल्यास ते शरिराला फायद्याचे असल्याचे पुढे आले, असे मत महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवी कलसाईत यांनी व्यक्त केले. या प्रकल्पावर एक संशोधन पेपरही सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.