सरसंघचालकांकडून पंतप्रधानांचे कौतुक

नागपूर : ‘संकल्पशक्तीमुळे अशक्यही शक्य होऊ शकत असल्याचा अनुभव यंदाच्या स्वातंत्र्यदिनी येत आहे. केंद्र सरकारने दाखविलेल्या या संकल्पातून आज संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती देश घेत आहे,’ या शब्दांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर भाष्य केले.

डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विरज शिंगाडे आणि नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, आपण ज्या प्रकारे स्वातंत्र्याचा संपूर्ण लाभ घेऊ शकतो, त्याचप्रमाणे आता काश्मीरमधील जनता स्वातंत्र्य उपभोगू शकणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारीपूर्ण संधी त्यांना मिळणार आहे. आपण कायम इतरांना शांततेचा संदेश दिला आहे. आपली संस्कृती कायम देणारी राहिली आहे. भाषा, प्रदेश कुठलाही असो आपण सर्व भारतीय आहोत. भारत जगेल तर सर्वाचे कल्याण होईल. तो महाशक्ती बनेल तर इतरांनापण संरक्षण देईल, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली देण्याची क्षमता वाढवायला हवी. आपण सर्वानी एकमेकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध व्हायला हवे. दुसऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करणे हीच धर्माची शिकवण आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

सरकार योग्य उत्तर देईल : भय्याजी जोशी

अनुच्छेद ३७०  फार पूर्वी रद्द व्हायला हवे होते. सर्वानी या प्रकारचे अस्थायी स्वरूपाचे असल्याचे सांगितले होते. विलंबाने का होईना पण योग्य पाऊल उचलले  गेले आहे. त्यामुळे काश्मिरी आणि इतरांची एकात्मतेच्या दिशेने वाटचाल होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संपूर्ण देश आणि हिंदू समाजाला आव्हान दिले आहे. सरकारच त्याचे योग्य ते उत्तर देईल असा विश्वास संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघ मुख्यालयातील ध्वजारोहणानंतर व्यक्त केला.

आपल्या पंतप्रधानांबाबत ‘वो हैं तो मुमकीन हैं’ असे म्हटले जाते. त्यात चुकीचे काहीच नाही. कारण त्यांनी दाखविलेल्या इच्छाशक्ती आणि संकल्पामुळे देशाच्या जमिनीचा एक भाग आज आपल्यात खऱ्या अर्थाने सामावू शकला आहे. सर्वाच्या मनातील संपूर्ण स्वातंत्र्याची संकल्पना ते साकार करू शकले आहेत.

डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक