तब्बल आठ महिन्यानंतर बंदी मागे

नागपूर : करोनाकाळात तब्बल आठ महिने जंगलपर्यटन बंद होते. गेल्या महिन्यात राज्यातील व्याघ्रप्रकल्प व अभयारण्यातील पर्यटनाला सुरुवात झाली. मात्र, शहरालगतच्या गोरेवाडा प्रकल्पातील पर्यटनावरील बंदी कायम होती. अखेर दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोरेवाडा जंगल पर्यटन सुरू होत असल्याची घोषणा करत प्रकल्प प्रशासनाने पर्यटकांना दिवाळी भेट दिली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२०नंतर गोरेवाडय़ातील पर्यटन बंद करण्यात आले. करोनाबाबत शासनाच्या दिशानिर्देशानुसार गोरेवाडा प्रकल्पातील पर्यटन सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी काही अटी आणि शर्तीनुसार परवानगी दिली आहे. येत्या १३ नोव्हेंबरपासून गोरेवाडय़ातील पर्यटनाला सुरुवात करण्यात येत आहे. सकाळी सहा ते दहा आणि दुपारी २.३० ते सायंकाळी सहा अशा पर्यटनाच्या वेळा राहतील. महाइकोटुरिझमच्या संके तस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. पर्यटकांसाठी चार जिप्सी उपलब्ध असून खासगी वाहनाने देखील पर्यटन करा येणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या पर्यटनासाठी आदल्यादिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत आणि दुपारच्या पर्यटनाची नोंदणी त्याच दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाईन नोंदणी करताना वाहनाचे ३००, पर्यटक मार्गदर्शकासाठी २०० आणि नोंदणीकरिता २० रुपये आकारले जातील.  ऑफलाईन नोंदणीमध्ये नोंदणी शुल्क रद्द करण्यात आले आहे. पर्यटनाला सुरुवात करण्यापूर्वी पर्यटकांची तापमान तपासणी करूनच आत सोडण्यात येईल. सर्व पर्यटक, गाईड व वाहनचालकांना मुखपट्टी आणि चेहरापट्टी तसेच वाहनात सॅनिटायझर अनिवार्य आहे. प्रत्येक पर्यटन फे रीनंतर वाहनाचे र्निजतुकीकरण करण्यात येईल. वाहनक्षमतेच्या ५० टक्केच लोकांना वाहनात परवानगी आहे. दहा वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना पर्यटनास मनाई करण्यात आली आहे. आरोग्यसेतू अ‍ॅप अनिवार्य असून रात्रीच्या पर्यटनाला मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे, असे गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई यांनी सांगितले.