समता प्रतिष्ठान गैरव्यवहार प्रकरणी खोब्रागडे यांची मागणी

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : बार्टीतर्फे चालवण्यात येणाऱ्या नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली. हे योग्य पाऊल आहे. पण, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त, उपायुक्त, बार्टीचे महाव्यवस्थापक, मुख्य समन्वयक यांच्याशिवाय गैरव्यवहार होऊ शकत नाही. तेव्हा कंत्राटी प्रकल्प अधिकारी, कर्मचारी यांच्या हकालपट्टीने काहीच साध्य होणार नाही, निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी  निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केली आहे.

यासंदर्भातील वृत्त लोकसत्ताने दिले होते. खोब्रागडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या खर्चाबाबत २७ जुलै २०१६ तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्त समाज कल्याण, पुणे यांनी २२ ऑगस्ट २०१६ ला सामाजिक न्याय विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. परंतु चार वर्षांचा कालावधी होऊन गेला तरी अजूनपर्यंत चौकशी पूर्ण करण्यात आली नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विकासासाठी असलेल्या निधीमधून नियमबाह्य़ पद्धतीने  खर्च करण्यात आला आहे. मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाने आयुक्त यांना चौकशी करायला सांगितले होते. परंतु सामाजिक न्याय विभागातील अधिकारी यातील भ्रष्टाचार लपवण्याचा आणि भ्रष्टाचारी व्यक्तींची पाठराखण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप  खोब्रागडे यांनी १२ डिसेंबर २०२० ला प्रधान सचिव श्याम तागडे यांना पत्र लिहून केला होता. परंतु अजूनही समता प्रतिष्ठानमधील कंत्राटी पद्धतीने नोकरी करीत असलेल्यांना जबाबदार धरले जात आहे व निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना वाचवण्यात येत आहे. त्यामुळे विशेष चौकशी पथकाने निर्णय प्रक्रियेतील प्रत्येक अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी खोब्रागडे यांनी केली आहे.

समता प्रतिष्ठानला गेल्या तीन वर्षांत दिलेल्या १६ कोटी रुपये खर्चाचा हिशेब देता आला नाही. तसेच निविदा न काढता काम दिले गेले किंवा निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समतादूत प्रकल्पावर झालेला खर्चाचा हिशेबही द्यावा लागणार आहे. जाहिरात न देता या प्रकल्प दूत नेमण्याची चौकशी होणार आहे. समतादूत प्रकल्पासाठी जाहिरात देऊन भरती करण्यात आली नाही. त्याऐवजी खासगी कंपन्यांकडून मनुष्यबळ मागवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमावरील खर्चात गैरव्यवहार झाला आहे. तक्रार करून चार वर्षे झाली आहेत. राज्य सरकारने सर्वसंबंधितांवर कारवाई केली तरच या चौकशीला अर्थ राहणार आहे. नाही तर चोर सोडून सन्याशाला फाशी दिल्यासारखे होईल.

– ई.झेड. खोब्रागडे, अध्यक्ष, संविधान फाऊंडेशन.