राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सारस पक्ष्यांच्या संमेलनाने सारस संवर्धकांमध्ये नवी उभारी आली आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर गेल्या आठवडाभरापासून १८ ते २३च्या संख्येत तरुण सारसांचा समूह तळ ठोकून आहे.

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात १९७० साली पक्षीप्रेमींनी सारस पक्ष्यांचे संमेलन अनुभवले. त्यानंतर सारसांची संख्या राज्यातून झपाटय़ाने घसरली. सेवा संस्थेने सारस संवर्धनाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्यात के वळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ात ते टिकू न राहिले. संवर्धनाचे फलित म्हणजे तब्बल ४४ वर्षांनी फे ब्रुवारी २०१४ मध्ये सारसाचे संमेलन घडून आले. यावेळी २३ ते २४च्या संख्येत सारस एकत्रित आले होते. तीन वर्षांनी २०१७-१८ मध्ये पुन्हा एकदा असेच घडले. आता पुन्हा  दोन ते तीन वर्षांनी या दोन्ही राज्याच्या सीमेवर सारस गोळा झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून कधी १८ तर कधी २३च्या संख्येत ते दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व सारस तरुण असून अंदाजे दोन वर्षे वयाचे आहेत. यातील केवळ तीन ते चारच सारस प्रौढ आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी माजी मानद वन्यजीव रक्षक व सेवा संस्थेचे सावन बाहेकर आणि त्यांची चमू सातत्याने प्रयत्न करीत आहे. संवर्धनाच्या दिशेने त्यांनी उचललेल्या पावलाला वनखात्यानेही साथ दिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत सारसांची घरटी संरक्षित होत असून त्यातून होणारे प्रजनन यशस्वी होत आहे.  यंदाच्या सारस संमेलनात १८ सारस पक्षी एकत्रच असून उर्वरित चार ते पाच सारस त्यांना अधूनमधून येऊन भेटत आहेत.

जोडीदार निवडण्यासाठी सहवास्तव्य

काही महिन्यांपूर्वी झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्य़ात सात तर बालाघाटमध्ये आठ ते नऊ सारस होते. जून, जुलैपर्यंत ते दिसून येत होते. सध्या दिसत असलेले सारस तेच असावेत. या संमेलनात हा पक्षी त्यांचा जोडीदार निवडतो किंवा तरुण सारस एकत्रित राहतात. त्यांचा हा एकत्र गोतावळा आठवडा ते एक महिन्यापर्यंत राहू शकतो, असे सावन बाहेकर यांनी सांगितले.