एकूण ५० स्वयंसेवकांना लस देऊन परिणाम तपासणार

नागपूर : ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित होणाऱ्या कोविशील्ड या करोनावरील १०० लसी अखेर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) केंद्रात पोहचल्या आहेत. ही लस घेण्यास इच्छुक पाच स्वयंसेवकांची स्क्रिनिंग आज सोमवारी सुरू झाली. इतरांचीही लवकरच स्क्रिनिंग होणार असून मेडिकलच्या केंद्रात एकूण ५० स्वयंसेवकांना ही लस देऊन  परिणाम तपासले जाणार आहेत.

ऑक्सफोर्डच्या या लशीची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यावर पुण्यातील एका कंपनीला लस तयार करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे. तेथूनच मेडिकलला  १०० लसी पाठवण्यात आल्या आहेत. त्यासाठी इच्छुक ४० स्वयंसेवकांनी मेडिकलमध्ये नोंदणी केली आहे. त्यातील पाच जणांची आज स्क्रिनिंग झाली.  यात संबंधिताला मधुमेह वा इतर काही आजार आहेत काय, त्यांना किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना करोना होऊन गेला काय, हे बघितले जात आहे.  या स्वयंसेवकांची करोना चाचणीसह प्रतिपिंड चाचणीही केली जात आहे.

या सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्यावर निरोगी आणि आजपर्यंत करोना न झालेल्या स्वयंसेवकांनाच ही लस दिली जाणार आहे. या स्वयंसेवकांवर मेडिकलचे तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवणार आहेत. एकदा लस दिल्यावर २८ दिवसांनी पुन्हा  दुसऱ्यांदा लस दिली जाईल. या कालावधीत रुग्णात प्रतिपिंड (अ‍ॅन्टीबॉडी) विकसित झाले काय, हे तपासले जाईल.

देशातील १७ केंद्रांवर सुरक्षितता आणि रोगप्रतिकार क्षमतांची मानवी चाचणी होणार आहे. या  प्रकल्पाचे निरीक्षक म्हणून मेडिकलच्या पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसीन विभागप्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम व उपनिरीक्षक म्हणून मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आहेत. ही लस मेडिकलला पोहचल्याच्या वृत्ताला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दुजोरा दिला आहे.

माकडांवर पूर्णपणे यशस्वी

‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ही लस माकडांवर पूर्णपणे यशस्वी ठरली. त्यांच्यात कोविड- १९ विरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली. यानंतर माणसावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. भारतामध्ये दिल्लीतील एम्स, मुंबईतील केईम, पुण्या-मुंबईत चाचणी सुरू झाली आहे.