विक्रेत्यांची नोंदच नाही, सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष

महेश बोकडे, नागपूर</strong>

शहरातील उद्याने आणि प्रमुख रस्त्यांवर  सकाळी रस विक्रीची दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांची अ न्न आणि औषध प्रशासनाकडे  नोंद नाही. रसविक्री करताना आवश्यक असलेल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे रस पिणाऱ्यास  बाधा झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल विचारण्यात येत आहे.

पश्चिम नागपूरच्या टिळक नगर, अंबाझरी, सेमिनरी हिल्स, महाराजबागसह मध्य नागपूरच्या गांधीबाग, पाचपावलीतील उद्यानासह इतरही उद्यान व सकाळी फिरण्याच्या मार्गावर फळ  आणि भाज्यांचे रस विकणाऱ्यांची गर्दी असते. या सर्व विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे, परंतु बहुतांश विक्रेते ती करीत नाही.  विक्रेत्यांना स्वच्छता, अ‍ॅप्रन घालणे, नियमित आरोग्य तपासणी, रस देताना हातात स्वच्छ मोजे घालणे, शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.

दोन वर्षांत २३३ विक्रेत्यांवर कारवाई

जिल्ह्य़ातील २३३ नोंदणीकृत विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई करून त्यांच्याकडून १० लाख २३ हजार रुपये  तडजोड शुल्क वसूल केले. २०१७- १८ मध्ये एफडीएच्या पथकाने ५०४ विक्रेत्यांची तपासणी केली. त्यातील २३३ जणांवर कारवाई केली गेली. १ एप्रिल २०१८ पासून ११४ विक्रेत्यांची तपासणी करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील कारवाई प्रस्तावित आहे.

सात हजार विक्रेत्यांची नोंद

नागपूर जिल्ह्य़ात पाणीपुरी, भेलपुरीपासून विविध खाद्यपदार्थ  पदपथावर विकणाऱ्यांची संख्या  सात हजार आहे. यापैकी  ८५ टक्के शहरात व्यवसाय करतात.

उद्यानांसह रस्त्यांवर रस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात अद्याप अन्न व औषध प्रशासन विभागाकडे एकही तक्रार नाही, परंतु सामान्यांच्या सुरक्षेसाठी तपासणी केली जाते.  शहरातील रस विक्री करणाऱ्यांचीही लवकरच तपासणी केली जाईल.

– मिलिंद देशपांडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (अन्न), नागपूर.

नागपूर जिल्ह्य़ात सध्या स्वाईन फ्लू आणि संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. रस विक्रेत्याला हा आजार असल्यास व त्याने ग्राहकाला रस दिल्यास त्याची  लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. सोबत प्रत्येक फळ आणि भाजीचा रस काढल्यावर ते विशिष्ट वेळेतच प्राशन करावे लागते. ही मर्यादा न पाळल्यास आरोग्याला धोका संभवतो.

– डॉ. मनीष पाटील,

अध्यक्ष, ऑरेंजसिटी होमिओपॅथी असोसिएशन, नागपूर.