अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांचे परखड मत

नागपूर :  करोनामुळे संपूर्ण मानव जातीसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून अशा संकटांना सर्वानी एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. परंतु देशात करोनाच्या प्रसारासाठी मुस्लीम समाज जबाबदार असल्याचा खोटा प्रचार जाणीवपूर्वक करण्यात येत असून समाजात मुस्लिमांना सैतान (राक्षस) ठरण्याचे हे षडयंत्र आहे, असे परखड मत उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फिरदोस मिर्झा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये मोठय़ा प्रमाणात तबलिगी थांबले असल्याची माहिती प्रशासनाला होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही त्या ठिकाणाला भेट दिली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यापूर्वी किंवा तबलिगींची माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना तेथून विलग करणे आवश्यक होते. पण, तसे करण्यात आले नाही. देशभरात टाळेबंदी लागू झाल्यानंतर अचानक तबलिगींचा मुद्दा समोर आला. तबलिगींना विलगीकरणात पाठवण्यात आले. अनेकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु त्याकरिता सर्व मुस्लीम समाज जबाबदार असू शकत नाही, असेही अ‍ॅड. मिर्झा म्हणाले.

तबलिगी जमात ही दैववादी आहे.  मृत्यूनंतरही जग असते व आपल्याला स्वर्गात (जन्नत) स्थान मिळावे, अशा अपेक्षेने अनेक मुस्लीम घरदार सोडून हा मार्ग पत्करतात. तबलिगींचा पेहराव, राहणीमान, आचरण सर्वसामान्य मुस्लिमांपेक्षा भिन्न असते. स्वत:ला शोधण्यासाठी ते तीन दिवस, दहा दिवस व चाळीस दिवसांसाठी  घराबाहेर पडतात. यादरम्यान कुणाच्याही घरी न जाता मशिदींमध्ये थांबतात. दिवसभर धार्मिक प्रवचन  आणि नमाज पठन करतात. त्यांच्या मशिदीही वेगळया असतात.  सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये त्यांचा सहभाग शून्य आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभर उभ्या राहिलेल्या सीएए, एनआरसीविरोधी आंदोलनात ते कुठेच नव्हते, असा दावाही अ‍ॅड. मिर्झा यांनी केला. देशात करोनाचा प्रसार तबलिगी किंवा मुस्लीम समाजामुळे झालेला नाही. हा विषाणू कसा प्रवास करतो, याचे वैज्ञानिक कारण समजून घेतले पाहिजे. पण, हे न करता देशात करोनाच्या प्रसारासाठी मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्यामागे एक कट आहे.

या कटाच्या माध्यमातून मुस्लिमांना राक्षस सिद्ध करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हा प्रकार थांबायला हवा, असे आवाहनही अ‍ॅड. मिर्झा यांनी केली.

संकटकाळात हिंदू, मुस्लीम का?

यापूर्वी देशाने त्सुनामी, भूकंप, पूर आदी अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. त्या संकटकाळात मरणारे हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, बौद्ध असे विविध धर्माचे लोक होते. तेव्हा कधीही मरणाऱ्यांची आकडेवारी हिंदू, मुस्लीम, बौद्ध अशा वर्गवारीने जाहीर करण्यात आलेली नाही. करोनाचे संकट संपूर्ण जगसमोर असताना भारतातच केवळ रुग्णांची आकडेवारी हिंदू, मुस्लीम अशी का जाहीर करण्यात येते? करोनाच्या माध्यमातून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा तर डाव नाही ना, अशी शंका अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी उपस्थित केली.