महापालिकेत विषयाचा अभ्यास करून ते परखडपणे मांडणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांचा समावेश होतो. गांधीबाग प्रभाग क्रमांक ४० मध्ये ते प्रतिनिधित्व करतात. १५ वर्षांपासून पालिकेत सदस्य म्हणून काम करताना त्यांनी एक वेळ स्थायी समितीचे अध्यक्षपदही सांभाळले. मागील दीड वर्षांपासून ते सत्तापक्ष नेता म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रभावी वक्तृत्त्व शैलीमुळे ते नेहमीच विरोधकांवर भारी पडतात. शहरात अंबाझरी तलावाजवळ उभे राहिलेले विवेकानंद स्मारक ही त्यांची कल्पना आहे. मात्र सुरेश भट सभागृहाचे रखडलेले काम त्यांना वेळेत पूर्ण करता आले नाही. ही संकल्पना सुद्धा तिवारी यांचीच होती.

अनिल सोले महापौर असताना तिवारी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. वर्षभराच्या कार्यकाळात शहर विकासांच्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. अनेक अभिनव प्रकल्पही राबविले. जनावरांची गोशाळा, २५०० रुपयात डायलिसीस, महिला समुपदेश केंद्र आदींचा त्यात समावेश आहे. स्वामी विवेकानंदचे स्मारकाचा प्रस्ताव होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले आणि ही त्यांच्या कारर्कीदीतील मोठी उपलब्धी आहे. प्रभागामध्ये गेल्या पाच वर्षांत १६ कोटींची कामे झाल्याचा दावा ते करतात. गांधीबाग उद्यानाचा विकास, रेल्वे प्लॅटफॉर्म निवासी शाळा, हज हाऊसमध्ये विविध सुविधा आदींचा त्यात समावेश आहे. कट्टर हिंदुत्ववादी अशीही महापालिकेत त्यांची ओळख आहे. सभागृहात पक्षाची भूमिका मांडताना विरोधकांवर तेवढय़ाच प्रभावीपद्धतीने टीका करण्याची सचोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

 

प्रभागाकडे दुर्लक्ष

महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यानंतर सत्तापक्ष नेता म्हणून गेल्या पाच वर्षांत दयाशंकर तिवारी यांनी शहरातील विकास कामांकडे लक्ष केंद्रित केले असले तरी प्रभागामध्ये मात्र दुर्लक्ष केले आले. सत्तापक्ष असताना अनेक विकास कामे प्रभागात मार्गी लावण्याचे काम करता आले असते, मात्र त्यांनी त्यांच्या खासगी संस्थांसाठी प्रकल्प राबविले. प्रभागात पार्किंग आणि कचऱ्याची समस्या मोठय़ा प्रमाणात असून त्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कुठलीही समस्या सुटली नाही. प्रत्येक वस्तीमध्ये कार्यकर्त्यांना लक्ष देण्यास सांगितले, मात्र स्वत: त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रभागात काही भागात सिमेंट रस्ते सोडले तर अन्य कुठलीच कामे झाली नाही. मनपाचे रुग्णालय नाही, जलालपुरा शाळेची अवस्था खराब झाली असून त्या ठिकाणी स्वत:च्या संस्थेच्या नावाखाली स्केटिंग सुरू केले. गांधीबाग उद्यानामध्ये विकास नाही. सायंकाळी त्या ठिकाणी असामाजिक तत्वाचा अड्डा असतो. बाजारपेठ असताना पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो.

– सैफुद्दीन करीम (काँग्रेस)

२०१२ मधील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार 

 

केलेली विकास कामे

अंबाझरी ओव्हर फ्लो परिसरात स्वामी विवेकानंदाचे स्मारक

जनावरांसाठी गोधन प्रकल्प

२५० रुपयात  गोरगरिबांसाठी डायलिसीस

सोक्ता भवनच्या जागेवर  संकुल

सुदर्शन आणि वाल्मीकी   समाजासाठी धाम