News Flash

शहरात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

पोलीस आयुक्तांनी आज वर्षभराच्या गुन्ह्य़ांचा आढावा बैठक पोलीस जिमखाना येथे बोलावली होती.

७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून येत्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज दिली.

हाँगकाँगच्या धर्तीवर नियंत्रण कक्ष -पोलीस आयुक्त; वर्षभरातील गुन्ह्य़ांचा पत्रकार परिषदेत आढावा
वाहतूक, गुन्हा घडण्यापूर्वी देखरेख, गुन्ह्य़ांचा तपास आणि गर्दीवर नजर ठेवून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत उपराजधानीला ‘सेफ सिटी’ बनवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून येत्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज दिली.
पोलीस आयुक्तांनी आज वर्षभराच्या गुन्ह्य़ांचा आढावा बैठक पोलीस जिमखाना येथे बोलावली होती. या बैठकीला शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. ‘सेफ सिटी’ शिवाय ‘स्मार्ट’ शहराची कल्पना करता येऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला ‘सेफ सिटी’ बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यादृष्टीने काम करताना २०१४ च्या तुलनेत २०१५ ला गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. यापेक्षा पुढे जाऊन नागरिकांची सुरक्षा, गुन्ह्य़ांचा तपास, वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. त्यात साधे, झेडपीटी आणि नाईट व्हीजन-थर्मल कॅमेऱ्यांचा समावेश असेल. त्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होतील. त्या माध्यमातून कुख्यात गुंडांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येईल. त्यांचा चेहऱ्यांची ओळख पटवून नियंत्रण कक्षाला आपोआप अपडेट मिळेल, अशी सुविधा निर्माण करण्यात येईल.महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबई आणि पुणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तेथील कॅमेऱ्यांना नियंत्रण करणाऱ्या कक्षांचा अभ्यासही नागपूर पोलिसांनी केला. परंतु हाँगकाँग येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक असून नागपूरचे नियंत्रण कक्ष हाँगकाँगच्या धर्तीवर असेल. पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्यतिरिक्त मेट्रो रेल्वे आणि शहरातील महत्त्वाच्या इमारतींमध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरेही नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येतील, असेही ते म्हणाले. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात ‘सिटीजन फॅसिलिटेशन सिस्टीम’, फसवणूक आणि अफवांविषयी लोकांना सतर्क करण्यासाठी सायबर सेलच्या माध्यमातून एकगठ्ठा संदेश पाठवण्यात येतील. प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून तक्रारदार, फिर्यादींना ठाण्यात मिळणाऱ्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येईल. गुन्हेगारीसंदर्भात यादव म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनांच्या घटनांमध्ये २४ ने घट झाली आहे. २०१४ ला शहरात १०३ खून झाले होते. तर २०१५ मध्ये ७९ खून झाले. वर्षभरात ९ हजार ६२० गुन्हे नोंदवण्यात आले. महिलांविरोधी गुन्ह्य़ांमध्ये गुन्हे बहुतांश प्रकरणात जवळची व्यक्तीच गुन्हेगार आहे. आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत प्रथमच नागपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत ९७ गुन्हे नोंदवण्यात आले असून राज्यात नागपूर चौथ्या क्रमांकावर आहे.
ई-चलनची सुविधा लागू होणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता ई-चलन देण्यात येईल. ई-चलन सुविधा लागू करण्यासाठी ‘सीसीटीएनएस’ व्यवस्थेत गुन्हेगारांचा लेखाजोखा साठवण्यात येत आहे. एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कुंडली सॉफ्टवेअरमध्ये असेल. पुन्हापुन्हा वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ट्राफिक इन्स्टिटय़ूट, मोटर स्कूलचा प्रस्ताव
पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी राज्यात ट्राफिक इन्स्टिटय़ूट आणि मोटर ड्रायव्हिंग स्कूल एक-एकच आहे. त्यामुळे या संस्थांवर अतिरिक्त ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याकरिता नागपुरात या दोन्ही संस्था निर्माण करण्यात याव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2016 4:33 am

Web Title: seven hundred cctv cameras in nagpur city
टॅग : Cctv
Next Stories
1 सुपरस्पेशालिटीत तीन नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम
2 ऑरेंज सिटी हस्तकला प्रदर्शनात चिनी बनावटीच्या वस्तूंनाच अधिक प्राधान्य
3 पदोन्नतीतील दिरंगाईला शिस्त लावण्याचे प्रयत्न
Just Now!
X