*  ‘मेडिकल’मधील धक्कादायक प्रकार *  महाआरोग्य शिबिरातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया स्थगित

नागपूर : मेडिकल येथील नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहात बुधवारी गटारचे पाणी शिरले. त्यामुळे येथील काही शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरातील काही रुग्णांना येथे शस्त्रक्रियेसाठी दाखल केले आहे, परंतु या घटनेमुळे उद्या गुरुवारी होणाऱ्याही सर्व नेत्र शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या. रुग्णालय प्रशासनाने मात्र आजच्या शस्त्रक्रिया स्थगित झाल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे.

नेत्र विभागाच्या तळमजल्यावरील शस्त्रक्रिया गृह क्रमांक ‘अ’ मध्ये रोज २०पेक्षा जास्त रुग्णांवर डोळ्याशी संबंधित विविध शस्त्रक्रिया होतात. या विभागात रुग्णांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे रुग्णालय प्रशासन सांगते, परंतु बुधवारी हा दावाच फोल ठरला. या विभागाच्या शेजारची गटारलाईन चोक झाल्यामुळे दुपारी घाण पाणी थेट शस्त्रक्रियागृहात शिरले. यावेळी  शस्त्रक्रिया सुरू होती. महाआरोग्य शिबिराच्या रुग्णांमुळे नेहमीच्या तुलनेत रुग्णांची संख्याही दुप्पट होती, परंतु पाणी शिरल्यावर काही शस्त्रक्रिया स्थगित झाल्याचे नातेवाईक सांगत आहेत.

नेत्र विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी तातडीने या घटनेची माहिती मेडिकल प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिली.  पीडब्ल्यूडीच्या काही अधिकाऱ्यांनी निरिक्षण करत आज दुरुस्ती शक्य नसल्याचे सांगत ती उद्याच केली जाणार असल्याचे सांगितले. एक दिवस हे शस्त्रक्रियागृह बंद करावे लागणार असल्यामुळे या रुग्णांची शस्त्रक्रिया लांबणीवर जाणार असल्यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गटारलाईनच्या दुरुस्तीनंतर शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाला र्निजतुकीकरण करण्यासह इतरही कामे करावी लागणार आहेत. ती तातडीने झाल्यास ठिक, अन्यथा शुक्रवारीही येथील शस्त्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट

मेडिकलमधील देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या खात्याकडून चांगल्या टाईल्सही वारंवार बदलल्या जातात,  परंतु रुग्णांशी संबंधित तातडीने कामे करायची असल्यास त्यांना विनंती केल्यावरही विलंब केला जात असल्याच्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या तक्रारी आहेत. या गडरलाईनच्या स्वच्छतेचीही जबाबदारीही सार्वजनिक  बांधकाम खात्याची आहे, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचे मेडिकल प्रशासन सांगत आहे.

‘‘मेडिकलच्या नेत्र विभागात सर्व शस्त्रक्रिया झाल्यावर घाण पाणी शिरले, परंतु प्रशासनाने तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून बुधवारीच दुरुस्तीबाबत सूचना केली आहे. त्यानंतरही गुरुवारी काही समस्या उद्भवल्यास नियोजित शस्त्रक्रिया इतरत्र करण्याबाबत प्रयत्न केले जातील. कोणत्याही रुग्णाला त्रास होऊ देणार नाही.’’

      – डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.