महापालिकेला १५ दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलनाचा इशारा

मुंबईतील खड्डय़ांच्या मुद्यावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने नागपुरातील खड्डय़ांच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. खड्डय़ांसाठी जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर १५ दिवसात कारवाई करा अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख व आमदार अनिल परब यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.

खड्डय़ांच्या मुद्यावरून दोन्ही पक्ष परस्परांना लक्ष्य करीत असल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मुंबई आणि नागपूर येथे खड्डय़ांवरून राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत रस्ते डांबरीकरणाचा घोटाळा चांगलाच गाजत असून कंत्राटदार आणि सत्ताधारी शिवसेना यांची मिलिभगत असल्यानेच रस्ते खड्डय़ात गेल्ेयाची टीका भाजपने निवडणुकांच्या तोंडावर सुरू केली आहे, यामुळे शिवसेनेची मुंबईत चांगलीच कोंडी झाली आहे. याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेची निवड केली आहे. नागपुरातही सध्या खड्डय़ांचा प्रश्न चांगलाच गाजत असून उखडलेले रस्ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरले आहे. येथेही भाजपचे सत्ताधारी कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे लक्षात घेऊनच शुक्रवारी  अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांना भेटले व त्यांना निवेदन दिले. या प्रकरणाची चौकशी करून पंधरा दिवसात दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परब यांनी दिला. विशेष म्हणजे, महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे. चार वर्षांपासून या प्रश्नावर पक्षाचे नगरसेवक काहीही बोलले नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खड्डय़ांचा प्रश्न उपस्थित केल्याने शिवसेनेचा रोख कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट होते. यासंदर्भात परब यांना विचारल्यावर त्यांनी ही बाब नाकारली. नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आम्ही  आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

एनआयटी बरखास्त करा

नागपूरच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यासला १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीचे प्रन्यासने काय केले, असा सवाल करून सुधार प्रन्यास बरखास्त करावी, अशी मागणी परब यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत.