शेतकऱ्यांबाबत शिवसेनेकडे कोणतीही भूमिका (धोरण) नाही. हा गोंधळलेला पक्ष आहे. राज्यात  सत्तेत असूनही शेतकरी आत्महत्या होत आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ते आज नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कृषी विधेयक संमत झाल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महता थांबतील काय, हमीभाव मिळेल, याची हमी सरकारने देते काय, असे प्रश्न विचारले होते. यासंदर्भात  फडणवीस म्हणाले, शिवसेनेची लोकसभेत एक तर राज्यसभेत दुसरी भूमिका असते. आमच्या सरकारमध्ये असून विरोधी पक्षासारखे वागत होते. मोदी सरकारने मंजूर केलेले दोन्ही कृषीविधेयक शेतकरी हिताचे आहेत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोठेही शेतमाल विकता येईल. तसेच हमीभाव देखील मिळणार आहे. कंत्राटी शेती करता येणार आहे. खासगी क्षेत्रात लोक शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल विकत घेऊ शकणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे  सरकार असताना २००६ मध्ये कंत्राटी शेतीसंदर्भात कायदा करण्यात आला होता. तो महाराष्ट्रात आजही लागू आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारने आज तसाच कायदा केला तर त्याला विरोध केला जात आहे. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना नेमलेल्या कृती दलाने देखील या सगळ्या शिफारशी केल्या होत्या. राहुल गांधी यांनी टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा २०१९ चा जाहीरनामा काढून वाचावा. काँग्रेसने जी आश्वासने दिली, ती मोदी सरकारने पूर्ण केली, असा दावा त्यांनी केला.

फोन टॅपिंगचे अधिकार गृहमंत्र्यांना नाहीत

राज्याच्या गृहमंत्र्यांना फोन टॅपिंगचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनादेखील नाही. त्यांना आढावा देखील घेता येत नाही. ते अधिकार केवळ मुख्य सचिवांना आहेत. गृहमंत्र्यांनी ते अधिकार स्वत:कडे घेऊ नये. परंतु ते असे करीत असल्याचे वृत्त आपण वाचले आहे. ते  सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन आहे, असेही फडणवीस म्हणाले.