स्वतंत्र विदर्भाची मागणी सुरु केल्यावर अखंड महाराष्ट्रासाठी हिरीरीने मदानात उतरलेल्या शिवसेनेने आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच विरोधकांचा गदारोळ सुरु असून शिवसेनेने थंड राहण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत मत व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी निदर्शने केली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याची विनंती केली होती. मात्र शिवसेनेला किंमत न देता मुख्यमंत्र्यांनी अणे यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना आता अखंड महाराष्ट्राचा मुद्दा सोडून देणार का की स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला भूमिका मांडायला लावणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजप मात्र शिवसेनेला फारशी किंमत न देता स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत मौन बाळगून आहे.