निराश कार्यकर्त्यांनी हळूहळू कार्यालय सोडले

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होणार, असे चित्र निर्माण झाल्यावर नागपुरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र थोडय़ावेळातच काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र न आल्याने राज्यपालांनी कालमर्यादा संपल्याचे वृत्त आल्याने जल्लोषाची जागा निराशेने घेतली व कार्यालयाबाहेर  निरव शांतता निर्माण झाली.

सोमवारी दिवसभर राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार असेच चित्र होते. दुपारी चारच्या सुमारास सेना नेते आदित्य ठाकरे व पक्षाचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी रवाना झाले. हे वृत्त बाहेर येताच राज्यात सर्वत्र सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष  सुरू केला. नागपुरातही  पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात शिवसैनिक गोळा झाले व आनंदोत्सव साजरा करू लागले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र थोडय़ाच वेळात शिवसेनेचा दावा राज्यपालांनी फेटाळल्याचे वृत्त येऊन थडकले. त्यामुळे आनंदोत्सवाची जागा निरव शांततेने घेतली. कार्यकर्तेही हळूहळू निघून जाऊ लागले.

राष्ट्रवादीच्या आनंदावरही विरजण

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा सादर केल्यानंतर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष  केला, परंतु नंतर राज्यपालांनी बहुमताच्या पत्राअभावी सेनेला आल्यापावली परत पाठवल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा सादर केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण तयार झाले. त्यांनी गणेशपेठ येथे पक्ष कार्यालयात फटाके उडवून जल्लोष साजरा केला.

यावेळी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जानबा मस्के, देवीदास घोडे, श्रीकांत शिवणकर, रवींद्र इटकेलवार, मिलिंद मानपुरे, महेंद्र भांगे, श्रीकांत आंबुलकर, प्रकाश लिखांकर, अरविंद डेंगरे, अविनाश शेरेकर, रवि पराते, मेहबूब पठाण, जतिन झाडे, योगेश पर्बत, नागेश देडमुठे, भीमराव हडके, प्रभूदास तायवडे, रजत अटकरे, दीपक पाटील उपस्थित होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.