मंगेश राऊत

दंतवैद्यक-वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये यंदा मराठा आरक्षण (एसईबीसी) राबवता येणार नाही, असा आदेश  उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्य सामायिक प्रवेश केंद्राला (सीईटी) ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागत आहे. मात्र, नव्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अतिशय कमी वेळ दिल्याने डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढून प्रवेश कधी घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

१० मे रोजी सीईटीने नवीन प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून ती २५ मे पर्यंतच पूर्ण करायची आहे. १० मे रोजी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून विद्यार्थ्यांना १४ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पसंतीचे महाविद्यालय ऑनलाइन निवडायचे आहे. १५ मे रोजी सकाळी ७ वाजता प्रवेश यादी प्रसिद्ध होणार असून १६ मेच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात डिमांड ड्राफ्ट व दस्तावेज देऊन प्रवेश घ्यायचा आहे. या प्रक्रियेत गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, खेड येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास त्याने डिमांड ड्राफ्ट कधी काढायाचा आणि प्रवेश केव्हा घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांची यादी १६ मे च्या रात्री ८ वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार असून व नवीन निवड यादी १७ च्या रात्री ८ वाजता प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून मिळाले तर पहिला प्रवेश रद्द करून नव्याने डिमांड ड्राफ्ट काढून नवा प्रवेश घेण्यासाठी त्याला २० मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत वेळ मिळणार आहे.  दरम्यान, १८ ला बुद्ध पौर्णिमा आणि १९ ला रविवार असल्याने बँकांना सुटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना २० ला सकाळी १०.३० नंतर डिमांड ड्राफ्ट काढून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल. अर्थात, ही कामगिरी एखाद्याकडे चार्टर विमान असल्यासच शक्य होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात सीईटी सेलला अनेकांनी संदेश व ई-मेल पाठवून आक्षेप नोंदवले आहेत. अनेकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, हे विशेष.

धनादेश पर्यायावर विचार

या अडचणीवर मात करण्यासाठी महाविद्यालयांशी चर्चा करून विद्यार्थ्यांकडून धनादेश स्वीकारण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून धनादेश व दस्तावेज स्वीकारल्यानंतर त्यांचे तात्पुरते प्रवेश झाले, असे समजले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी धनाकर्ष सादर करून धनादेश परत घ्यावा. धनाकर्ष सादर केल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल. त्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळताच संकेतस्थळावर सर्व महाविद्यालयांना धनादेश स्वीकारण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील.

– आनंद रायते, आयुक्त, सीईटी.