विद्यापीठात तक्रारींचा पाऊस, विद्यार्थी संघटना आक्रमक

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा घोळ आज मंगळवारीही सुरूच होता. बी.ए. राज्यशास्त्राच्या तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप झाला. मदत केंद्रावर तक्रारींचा पाऊस पडला. परीक्षेच्या गोंधळाविरोधात विद्यार्थी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेत विद्यापीठावर हल्लाबोल केला.

मंगळवारी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यात ११.३० वाजता राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होताच पहिल्या आठ मिनिटात ४८५४ विद्यार्थ्यांनी लॉगिन केले. लॉगिन झाले तरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी

भाषेत पेपर गेल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे विद्यार्थ्यांनी मदत केंद्रावर फोन करीत तक्रार नोंदवली. मात्र, ऐन वेळेवर पेपर बदलणे अशक्य असल्याने ५६०४ पैकी केवळ ५०१८ विद्यार्थ्यांनाच पेपर देता याला. चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे सरासरी सहाशे  विद्यार्थी परीक्षेला मुकले असून या विद्यार्थ्यांची नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे.

यासाठी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आल्याचे परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

मदत केंद्रात पाच हजार कॉल

विद्यापीठाने तयार केलेल्या मदत केंद्रात एका दिवसात चार ते पाच हजारांहून जास्त विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे वेळेत लॉगिन होत नसल्याने विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळी मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे खुद्द परीक्षा संचालक डॉ. साबळे यांनीच दिवसभरात बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याची माहिती आहे.

आजचे आव्हान मोठे

विद्यापीठाद्वारे बुधवार १४ ऑक्टोबरला तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. त्यामुळे यावेळी मोठय़ा प्रमाणात लॉगिन आणि इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षा अ‍ॅपमध्ये येणाऱ्या अडचणींना रोज दुरुस्त केले जात असले तरी वेळेत लॉगिन न होण्याचा त्रास उद्भवल्यास बुधवारीही विद्यार्थी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या  तक्रारींनुसार रोज ‘परीक्षा अ‍ॅप’मध्ये सुधार के ले जात आहेत. लॉगिन करताना मोबाईलमध्ये इंटरनेट जोडणी ठीक नसल्याने अडचणी येत आहेत. या सर्वच पातळीवर काम सुरू असून कुणीही विद्यार्थी परीक्षेला मुकणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

– डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

विद्यार्थी संघटनांचा घेराव

विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता भारतीय युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घ्यावी, अशी मागणी युवा मोर्चाने कुलगुरूंना केली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मोबाईल अ‍ॅपवर विरोधात संताप व्यक्त केला. याशिवाय अभाविपने मदत केंद्रांमध्ये वाढ करण्यासह परीक्षा अ‍ॅपमधील समस्या दूर करण्याची मागणी केली.  समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.