|| महेश बोकडे

आघाडी सरकारच्या काळात घोषणा; आता नव्या सरकारकडून अपेक्षा वाढली :- आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात राज्य कॅन्सर इन्स्टिटय़ूटसह इतर सहा वेगवेगळ्या वैद्यकीयचे प्रकल्पांची घोषणा केली होती. युती सरकार सत्तेवर आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी  ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांच्याही काळात हे प्रकल्प अपूर्णच असून आता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून या प्रकल्पाच्या पूर्णतेबाबत अपेक्षा वाढली आहे.

विविध संघटनांच्या अभ्यासानुसार देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रुग्ण हे नागपूरसह विदर्भात आढळतात. त्यामुळे येथे कर्करुग्णांनी आंदोलन केल्यावर  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात राज्य कॅन्सर इन्स्टिटय़ूटची घोषणा केली होती. त्यानंतर औरंगाबादला प्रस्तावित प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्र नागपुरात करण्याचा निर्णय झाला. हा प्रकल्प मेडिकलच्या टीबी वार्ड परिसरात व्हावा, यासाठी जागा निश्चितीसह इतरही प्रक्रिया झाली. त्यानंतर आघाडी सरकारने नागपूरला जिल्हा रुग्णालय, सिकलसेल इन्स्टिटय़ूट, डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला पदव्युत्तर संस्थेत परावर्तित करण्यासोबतच पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्रही मंजूर केले. परंतु या सरकारच्या  काळात हे प्रकल्प  पूर्ण झाले नाहीत. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकार आले. त्यांनी सगळे जुने प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होण्यापलीकडे काहीच झाले नाही. राज्य कॅन्सर इन्स्टिटय़ूट औरंगाबादला पळवल्यावर शासनाने येथे कॅन्सर रुग्णालय बांधण्याचे अध्यादेश काढले.

उपकरणासाठी सुमारे २० कोटींचा निधी मेडिकलला मिळाला. तो परत जाऊ नये म्हणून हाफकीनकडे वळवण्यात आला. परंतु या संस्थेच्या बांधकामाबाबत आराखडय़ाचाही पत्ता नाही.

अफ्रिकन देशात जाण्यासाठी आवश्यक पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र, सिकलसेल इन्स्टिटय़ूटचाही अद्याप पत्ता नाही. आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे  आहेत. ते नागपूरकरांसाठी महत्त्वाचे हे प्रकल्प तातडीने मार्गी लावणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सगळ्याच पक्षांच्या सरकारने विदर्भातील वैद्यकीय प्रकल्पांना दुय्यम स्थान दिले. गेल्यावेळी प्रथमच मुख्यमंत्री, वित्तमंत्री, ऊर्जामंत्रीपद विदर्भाच्या वाटय़ाला आल्याने येथे सगळेच प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु भ्रमनिराश झाला. महाविकास आघाडी सरकारने तातडीने हे प्रकल्प मार्गी लागावे म्हणून त्याचे वेळापत्रक निश्चित करून काम करण्याची गरज आहे. – त्रिशरण सहारे, अध्यक्ष, वैद्यकीय महाविद्यलय आरोग्य कर्मचारी संघटना.