‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर कारवाई

कोळसा चोरीचा हब असलेल्या कामठीमध्ये जाऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी कुख्यात सोनू हाटे व त्याच्या पाच साथीदारांना रंगेहात पकडले. अनेक वर्षांपासून तेथे कोळसा चोरी सुरू होती. आजवर कामठीमध्ये कोळसा चोरीवर कोणत्याच अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती, हे विशेष.

‘कोळसा चोरीस पोलिसांचेही हात काळे’ या मथळ्याखाली १० फेब्रुवारीला ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यात कोळसा खाणींमधून औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये वाहून नेताना ट्रक चालकांच्या संगनमताने कामठी परिसरात मोठय़ा प्रमाणात कोळशाची चोरी करण्यात येत असल्याची बाब स्पष्ट केली होती.

सोनू हाटे हा त्याचा सूत्रधार होते. त्या वृत्ताची परिमंडळ-५ चे उपायुक्त सुहास बावचे यांनी कार्यभार स्वीकारताच दखल घेतली आणि बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कामठीतील नेरी बसस्थानकापासून काही अंतरावर चोरीचा कोळसा एका वाहनात भरताना रंगेहात पकडले. यात सोनू राजू हाटे (३२) रा. नगरपरिषदेसमोर कामठी, दिलीप अशोक दोडगे (२५), इरफान पठाण खलील पठाण (२२) रा. सैलाबनगर, राजकुमार शंकर ठाकूर (२८) रा. हमालपुरा, मनोज राजकुमार कनोजे (२४) रा. कन्हान कंद्री आणि शंकर रमेश बागडे (३१) रा. सैलाबनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी हे अनेक महिन्यांपासून कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून कोळसा चोरत होते. तो कोळसा रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नालीमध्ये जमा करायचे. त्यानंतर तो कोळसा एमएच-४०, वाय-८३ क्रमांकाच्या महिंद्रा पिक अप व्हॅन व इतर वाहनांमध्ये भरून ते आपल्या डेपोत घेऊन जायचे. त्यानंतर हा कोळसा बाजारात विकला जात होता. त्यामुळे बुधवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात एकूण दोन हजार २७५ कोळशासह २ लाख ६३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त बावचे यांनी दिली.