सामाजिक कार्यकर्ते संपत रामटेके यांचे निधन

सिकलसेलग्रस्तांना सोयी-सुविधांसाठी गत ४० वर्षांपासून संघर्ष करणारे, यासाठी एक चळवळ उभी करून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे सामाजिक कार्यकर्ते संपत रामटेके (७२) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिकलसेलग्रस्तांसाठी लढणारा खंदा लढवय्या काळाच्या पडद्याआड गेला.

संपत रामटेके यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्य़ातील महादवाडी येथे झाला. वेस्टर्न कोल फिल्डमध्ये ते अधीक्षक अभियंता होते. मुलाला सिकलसेल आजाराने ग्रासले होते. हा आजार एक सामाजिक समस्या माणून तो दूर करण्यासाठी त्यांनी चार दशक अव्याहतपणे प्रयत्न केले.

शासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सरकारविरोधात लढा सुरू केला. एकीकडे रुग्णांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करणारे रामटेके दुसरीकडे या आजारावर नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नशील होते.

देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सिकलसेलग्रस्तांसाठी लढा देणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या निधनाने ही चळवळ पोरकी झाली आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांपर्यंत सिकलसेलग्रस्तांचा प्रश्न

सिकलसेल ग्रस्तांचे प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचवले. त्यांच्या लढय़ामुळे महाराष्ट्र शासनाने मेयोत सिकलसेल संशोधन केंद्र, मोफत उपचार, गरीब रुग्णांसाठी ६०० रुपये मासिक उपचार खर्च, मेडिकलमध्ये सिकलसेल डे-केअर सेंटर, मोफत गर्भजल परीक्षण, मोफत एसटी पासच्या सुविधाही लागू केल्या. त्यांच्याच प्रयत्नामुळे सिकलसेल रुग्णांना रेल्वेत ५० टक्के सवलत आणि दिव्यांग व्यक्तींचे अधिकार मिळाले. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे हेच त्यांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय होते. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमीर खान याने त्यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.