-करोनामुळे मार्च- २०२१ पासून सर्व फेऱ्यांना थांबा  -महामंडळाला रोज सुमारे दीड लाखाचा फटका

महेश बोकडे

नागपूर : नागपूरसह विदर्भात करोनाचा उद्रेक झाल्यावर मार्च २०२१ पासून विदर्भाला लागून असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांनी एसटीला त्यांच्या राज्यात प्रतिबंध घातला. तर रुग्ण कमी झाल्यावर आता छत्तीसगड, तेलंगणा राज्यात नागपूरहून पुन्हा एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्यात. परंतु मध्यप्रदेशकडून अद्यापही एसटीच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी नसल्याने या राज्याशी महामंडळाचा संपर्क तुटला आहे. तो पुनस्र्थापित होत नसल्याने एसटीला रोज सुमारे दीड लाख रुपयांचा फटका बसत आहे.

एकेकाळी नागपूर ही मध्यप्रदेशची राजधानी होती. कालांतराने नागपूर ही राज्याची उपराजधानी झाली. परंतु आजही नागपुरातील रहिवाशांचे मोठय़ा संख्येने नातेवाईक मध्यप्रदेशात राहतात. त्यामुळे येथील नागरिकांचे मध्यप्रदेशशी जवळचे संबंध आहेत. करोनापूर्वी नागपूरहून एसटीच्या रोज मध्यप्रदेशच्या पांढुर्णा, सौंसर, छिंदवाडा, पचमढी, बालाघाट, शिवनी, लोधीखेडा, वाराशिवनीसह इतरही काही भागात ४२ फेऱ्या चालत होत्या. त्यावर सुमारे ६० टक्के प्रवासी भारमानही असायचे. त्यातून एसटीला रोज सुमारे दीड लाखांचा महसूल मिळायचा. करोनाच्या पहिल्या लाटेत फेब्रुवारी २०२० दरम्यान देशभरातील कडक टाळेबंदीत या फेऱ्या सुमारे तीन महिने बंद पडल्या. त्यानंतर हळूहळू टाळेबंदी शिथिल झाल्यावर एसटीच्याही मध्यप्रदेशातील फेऱ्या पुन्हा पूर्वस्थितीत येऊ लागल्या होत्या. दरम्यान, फेब्रुवारीपासून नागपूरसह विदर्भात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व मृत्यू वाढले. त्यामुळे मार्च २०२१ पासून मध्यप्रदेशसह शेजारच्या तेलंगणा व छत्तीसगड या तिन्ही राज्यांनी तेथे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध घातले. परंतु आता नागपूरसह विदर्भात करोना नियंत्रणात आहे. त्यामुळे छत्तीसगड व तेलंगणात सुमारे १५ ते २० दिवसांपासून एसटीची पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. परंतु मध्यप्रदेशकडून अद्यापही एसटीला त्यांच्या राज्यात प्रवासी वाहतुकीसाठी हिरवा कंदील नाही. त्यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटकाही बसत आहे.

पाच हजार किलोमीटर परिचालनाचा फटका

नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारित विविध बसस्थानकाहून मध्यप्रदेशच्या विविध भागात सर्व फेऱ्या मिळून रोज सुमारे ५ हजार किलोमीटरचे परिचालन होत होते. परंतु मार्च-२०२१ पासून हे बंद पडले आहे. दुसरीकडे बऱ्याच खासगी बस व खासगी वाहनातून मध्यप्रदेशला आजही प्रवासी वाहतूक होताना दिसते. त्यामुळे एसटी व खासगी वाहनांना वेगवेगळा न्याय कसा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

एसटीची मार्च-२०२१ पासून मध्यप्रदेशातील विविध भागात प्रवासी वाहतूक बंद असल्याने सुमारे ५ हजार किलोमीटरच्या परिचालनावर परिणाम पडला आहे. मध्यप्रदेश सरकारकडून ७ जुलैपर्यंत निर्बंध असल्याने त्यानंतर ते शिथिल होऊन एसटीला प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाल्यास महामंडळाचे काही प्रमाणात उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल.’’

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक (नागपूर), एसटी महामंडळ.