महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून गैरहजर व अपहार प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक कुचंबणा थांबावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या व्यक्तीचे वय ४५ पेक्षा जास्त नसावे, ही त्यात अट आहे.

चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्य लाखो प्रवाशांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून ‘एसटी’च्या प्रवासाकडे बघितले जाते. त्यांना अद्ययावत सेवा देण्याकरिता हजारो कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया करण्यात आलेल्या आहेत. एसटी महामंडळात गेल्या अनेक वर्षांत वारंवार माहिती न देता सेवेत गैरहजर राहण्यासह विविध अपहार प्रकरणात मोठय़ा संख्येने वाहकांसह इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाने बडतर्फ केलेले आहे. ही कारवाई योग्य असली तरी त्यामुळे या व्यक्तींचे कुटुंब उघडय़ावर आले आहे.

या कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा थांबावी म्हणून एसटी प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना मानवीय दृष्टीने सेवेची पुन्हा संधी दिलेली आहे. मुख्यालयातून तसे आदेश एसटीच्या नागपूरसह प्रत्येक विभाग नियंत्रण कार्यालयात पाठवले आहेत.

संबंधित कर्मचारी ४५ वयापेक्षा जास्त असू नये ही अट आदेशात टाकण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना व्हावा म्हणून यासंदर्भात ‘एसटी’च्या सगळ्या आगारांसह एसटीच्या कार्यालयात ही माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

दलाल सक्रीय होण्याची शक्यता

एसटी प्रशासनाने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेवर परत घेण्याकरिता आणलेल्या या योजनेच्या आड गैरमार्गाने कमाई करण्यासाठी काही दलालही सक्रीय होण्याची शंका एसटीच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तेव्हा या भामटय़ांच्या भुलथापांना बळी न पडता थेट एसटीच्या संबंधित कार्यालयात उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी केले आहे.