मुख्यालय नागपूरला होणार

राज्यातील विविध प्राणिसंग्रहालयांच्या व्यवस्थापनात एकवाक्यता यावी आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय
प्राधिकरणाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केली होती. त्या अनुषंगाने हे प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने १० डिसेंबरला घेतला असून, या प्राधिकरणाचे मुख्यालय नागपूर येथे होईल.
वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षण ही एक संवेदनशील बाब आहे. मानव-वन्यजीव संघर्षांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्य वन्यजीव रक्षकांना प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या कल्याणाकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही. राज्यात वनविभागामार्फत तीन व इतर यंत्रणांमार्फत ११ प्राणिसंग्रहालयये चालविण्यात येतात. राज्यात वाघ, बिबटय़ा सफारी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालयांचे काम व्यवस्थित व सुरळीतपणे चालवण्याकरिता कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्राणिसंग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे.या प्राधिकरणाच्या स्थापनेसंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात येणार असून नियामक मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती नेमण्यात येणार आहे.
शासकीय प्राणिसंग्रहालयात विकास आराखडय़ाप्रमाणे कामे महाराष्ट्र शासनाच्या व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशान्वये कार्यान्वित करणे, राज्यात महापालिका व खासगी संस्थांकडून निर्मिती करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रण, तसेच नियमन, संकटग्रस्त प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन, वन्यप्राणी आरोग्य व व्यवहारासंबंधी संशोधन कार्यक्रम इतर संस्था, प्रयोगशाळांच्या समन्वयाने कार्यान्वित करणे, राज्यातील प्राणी संग्रहालयांकरिता इतर राज्य व विदेशातून विक्री, तसेच अदलाबदलीद्वारे प्राणी उपलब्ध करून देणे, वने व वन्यजीव संवर्धन, प्राणीसंग्रहालयांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेत व वन्यप्राण्यांबाबत आवड निर्माण करण्याकरिता जनजागृती करणे ही या प्राधिकरणाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे आहेत.