विद्यापीठाच्या अट्टाहासामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नागपूर : करोनाच्या दहशतीत परीक्षा घेण्याच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अट्टाहासामुळे आज एम.टेक.च्या एका विद्यार्थिनीने चक्क अतिदक्षता विभागातून (आयसीयू) परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ती विद्यार्थिनी कालपर्यंत सामान्य विभागात उपचार घेत होती. मात्र, परीक्षेच्या दडपणामुळे तिला अतिदक्षता विभागात हलवण्याची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आणखी काही विद्यार्थ्यांनी करोनाने संक्रमित असतानाही परीक्षा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर एम.ए., एम.एस्सी. आणि एम.कॉम.च्या प्रथम सत्राच्या परीक्षा ५ ते २० मे दरम्यान महाविद्यालय स्तरावर घ्याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आज बुधवारी परीक्षा घेतली. सध्या करोनाने थैमान घातले असून अनेक विद्यार्थी, त्यांचे पालक करोनाचा सामना करीत असल्याने तूर्तास परीक्षा घेऊ नये अशी विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. काहींनी महाविद्यालय आणि विद्यापीठ परीक्षा विभागाला तसे पत्रही लिहिले. मात्र, ऑनलाईन परीक्षा असल्याने काही फरक पडत नाही अशी उत्तरे देण्यात आली. शेवटी आज रायसोनी अभियांत्रिकीच्या एम.टेक. प्रथम सत्राच्या एका विद्यार्थिनीला चक्क आयसीयूमधून परीक्षा देण्याची वेळ आली आहे.  तिच्याच वर्गातील दोन विद्यार्थी करोना संक्रमित असताना त्यांनाही परीक्षा द्यावीच लागली. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक प्राध्यापक, महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याने अशा भयावह परिस्थितीमध्ये परीक्षा घेऊ नये, किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासाठी आग्रह करू नये, अशी मागणी प्राचार्य संघटनांकडून करण्यात आल्यानंतरही विद्यापीठाने या मागणीकडे दुर्लक्ष केले.

विद्यापीठाविरुद्ध संताप

राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक टाळेबंदी लागू केली आहे. शिवाय केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठानेही  विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व संबंधित सर्व कर्मचारी वर्गाच्या आरोग्याचा विचार करून सर्व प्रकारच्या परीक्षा जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्या.

– विष्णू चांगदे, सदस्य, व्यवस्थापन परिषद.

करोनामुळे प्राध्यापक, प्राचार्य व इतर कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. सर्व तणावात आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे आणि परीक्षा देणे या दोन्ही गोष्टी अडचणीच्या असल्याने तूर्तास परीक्षा स्थगित कराव्या व परीक्षा अर्ज करण्याच्या मुदतीमध्येही वाढ करावी.

– मनमोहन बाजपेयी, सदस्य विधिसभा.