25 September 2020

News Flash

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शालेय परिवहन समिती सक्रिय हवी

समितीच्या अध्यक्षपदी शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्याची नियुक्ती बंधनकारक आहे.

 

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर व अतुल आदे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शालेय परिवहन समिती सक्रिय हवी. त्यातूनच स्कूलबसच्या अपघातांसह इतरही अनुचित घटना टळू शकतात. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्यास आरटीओकडून पूर्ण मदत केली जाईल, असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) श्रीपाद वाडेकर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) अतुल आदे यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

वाडेकर म्हणाले,  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने २०११ मध्ये स्वतंत्र समितीद्वारे स्कूल बस नियमावली आणि धोरण तयार केले. २०१२ मध्ये ते लागू झाले. त्यात स्कूलबस/ व्हॅनबाबत काटेकोर नियम केले गेले. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुने वाहन स्कूलबस म्हणून वापरता येत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनातील अंतर्गत रचनेसह चालकाबाबतही विविध नियम आहेत. विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांबरोबरच नियमावलीमध्ये  प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती सक्तीची केली गेली.

समितीच्या अध्यक्षपदी शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्याची नियुक्ती बंधनकारक आहे. त्यात पोलीस, आरटीओ, शिक्षण विभाग, वाहतूक कंत्राटदार, पालक प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश हवा. अतुल आदे म्हणाले, समितीला स्कूलबसची निवड व करार करणे, त्याच्या चालकांची सर्व माहिती गोळा करणे, वेळोवेळी बसची तपासणी, अंतरानुसार भाडे ठरवायचे आहे. या समितीची प्रत्येक तीन महिन्यात एक बैठक व्हायला हवी. परंतु अनेक समित्यांच्या बैठकीसाठी आरटीओला पत्र येत नसल्याने ती होते काय, त्याबाबत शंका उपस्थित केली जाते. हल्ली वाहनांशी संबंधित नियम मोडल्यास आरटीओकडून या स्कूलबसवर कारवाई केली जाते. प्रत्येक स्कूलबसची स्थिती इतर काही समस्या असल्यास त्या  सुटणे शक्य आहे. त्यात स्कूलबस चालकाकडून कुणा विद्यार्थ्यांशी गैरवर्तन होत असल्यास तेही पुढे येऊन भविष्यातील घटना टळू शकतात. शिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय परिवहन समिती सक्रिय करण्यासाठी पुढाकार घेतल्यास आरटीओकडून पूर्ण मदत केली जाणार असल्याचेही आदे यांनी सांगितले.

पालकांसाठी महत्त्वाचे

  • मुलाला स्कूलबसमध्ये सोडताना वाहनाची स्थिती व चालकावर लक्ष ठेवावे
  •  क्षमतेहून जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनात मुलाला पाठवू नये
  •  मुलाकडून स्कूलबस चालकाच्या वागणुकीची रोज माहिती घ्यावी
  •  समितीची मंजुरी असलेल्या स्कूलबसवरच मुलांना शाळेत पाठवावे
  • चालकाची कार्यशैली असुरक्षित असल्यास संबंधितांकडे तक्रार करावी

कारवाईचा आलेख वाढताच

नागपूर जिल्ह्य़ात प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा आलेख वाढत आहे. २०१८- १९ मध्ये नागपुरात २०६ स्कूलबस/ व्हॅन, २० अवैध वाहनांवर कारवाई करत ५ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत शहरात २०६ स्कूलबस/ व्हॅन आणि ६३ अवैध वाहनांवर कारवाई करत १२ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. नागपूर ग्रामीण मध्येही २०१९ ते डिसेंबर १९ पर्यंत ८३ स्कूलबस/ व्हॅन आणि २६ अवैध वाहनांवर कारवाई करत ४.४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्ह्य़ातील स्कूलबसची स्थिती

कार्यालय           स्कूलव्हॅन/स्कूलबस    

नागपूर (श.)               ८५९

नागपूर (ग्रा.)            १,६६०

पूर्व नागपूर                 १,०८८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:00 am

Web Title: student security traveller school bus committee akp 94
Next Stories
1 वीज दरवाढीची झळ बसू नये म्हणून प्रयत्न
2 अपघातमुक्त रस्त्यांसाठी ‘व्हीएनआयटी’ प्रशिक्षण देणार
3 न्यायालयीन आयोग नेमण्यावर उत्तर दाखल करा!
Just Now!
X