* सामाजिक न्याय खात्याच्या सचिवांची माहिती * महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे गुणवंतांचा सत्कार

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पीएच.डी.साठी अभ्यासवृत्ती घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रहात होते त्या घरात राहण्याची परवानगी दिली जाईल. त्याठिकाणी लागणारा पूर्ण खर्च महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय विभाग करणार असल्याची माहिती या खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवंतांबरोबरच परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीने दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे, आयकर विभागाचे उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, यूपीएससी- २०१७ उत्तीर्ण विद्यार्थी दशदीकपाल नंदेश्वर आणि सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधव झोड व्यासपीठावर उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, अनुसूचित जाती व जमातीचा निधी इतर योजनांवर वळता होणार नाही, तो कमी होणार नाही आणि तो संपुष्टातही (लॅप्स) येणार नाही, यासंबंधीचे विधेयक तयार झाले असले तरी ते पुढे सरकत नाही. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात अशाप्रकारचे विधेयक संमत झाले आहे. यापुढे विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासवृत्ती व शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यातूनच त्यांना मिळतील. त्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागेल. परदेशी जाण्यासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष आता बदलण्यात आले आहेत. जगातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पन्न मर्यादा नसून विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब राहत असलेल्या घरात राहायला मिळून ‘केअर टेकर’ची भूमिका बजावता येईल, असेही ते म्हणाले. डॉ. उपसेन बोरकर म्हणाले, हिमालयाला छेदून जाण्याइतपत आत्मविश्वास आपल्यात असणे आवश्यक आहे. फारच चौकटीत काम करावे लागते, असे सरकारी नोकरीबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. समाजाचे काम करीत असताना बदल्या होणे, पदोन्नती न मिळणे वगैरेंसारखे त्रास सहन करावे लागतात. त्यासाठी खचून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही.

अध्यक्ष पी.पी. पाटील म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी शिक्षण घ्यायला सांगितले, पण ते घेत असताना समाजाला कधीही विसरता कामा नये. कारण व्यक्ती समाजाला घडवत नसते तर समाज व्यक्तीला घडवत असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जडणघडणात समाजाचा सिंहाचा वाटा असतो. सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधव झोड यांचेही यावेळी भाषण झाले. ई.झेड. खोब्रागडे यांनी सामाजिक न्याय मिळताना सामान्य माणसांना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी आवश्यक घटकांचा ऊहापोह भाषणात केला. संचालन डॉ. अरुण हुमने यांनी केले.

सर्वच आपले गुरू -नंदेश्वर

नुकताच २०१७च्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेला दशदीकपाल नंदेश्वर याने ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक तयारीची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तो म्हणाला, केवळ शिक्षकच नव्हे तर निसर्ग, आईवडील, मित्र-मैत्रिणी इत्यादी सर्वच आपले गुरू असतात, कारण ते आपल्या हिताचे काहीतरी शिकवत असतात. नेहमी ध्येय उच्च राखायला हवे. ध्येय कमकुवत असणे म्हणजे गुन्हाच! आयुष्यात मेहनत आणि संधी हा बिंदू साधता यावा लागतो. त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात.