दबावामुळे मवाळ झालेल्या सहसंचालकांचे पुन्हा पत्र

नागपूर : टाळेबंदीच्या काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा देण्यास प्राध्यापकांकडून हयगय केली जात आहे. त्यामुळे किमान

या सत्रामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे तपशील तरी तात्काळ सादर करावे, असे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे यांनी महाविद्यालयांना दिले आहे.

राज्य शासनाने या सत्रामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाची (पारंपरिक पद्धतीने/ऑनलाईन) माहिती महाविद्यालयांना मागवली होती. तसे पत्र उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले होते. प्रपत्र अ नुसार अभ्यासक्रमाची माहिती देण्यास प्राध्यापक वर्गाने सहमती दर्शवली होती. मात्र, यासोबत असलेल्या प्रपत्र ब मध्ये प्राध्यापकांनी टाळेबंदीच्या काळात कुठले काम केले, याची माहिती देण्यास विरोध करण्यात आला होता. नागपूर टीचर्स असोसिएशनने याचा राज्यभर विरोध केला होता. हे पत्र कायदेबा असून प्राध्यापकांच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करीत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अद्याप अर्ध्याही महाविद्यालयांनी माहिती न पाठवल्याने सहसंचालकांनी पुन्हा पत्र काढून किमान पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती तात्काळ पुरवावी अशा सूचना दिल्या आहेत. यासह प्रपत्र ब मधील इतर माहिती ही महाविद्यालयाकडे जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सूचना बदलल्या

नागपूर टीचर्स असोसिएशनने(नुटा) सहसंचालकांच्या या पत्राला विरोध केला होता. नुटाच्या विरोधामुळे सहसंचालकांनी  माघार घेतली असून केवळ अभ्यासक्रमाची माहिती तात्काळ सादर करा व इतर माहिती महाविद्यालय स्तरावर जमा करावी अशा सूचना केल्याचे बोलले जात आहे.