२२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद; ८ जणांचा मृत्यू; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

महेश बोकडे, नागपूर

नागपूरसह राज्याच्या बऱ्याच भागात पुन्हा ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढले आहे. नव्या वर्षांतील २२ दिवसांमध्ये राज्यात एकूण २६२ रुग्ण आढळले असून यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत पुणे तर मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ाचा क्रमांक वरचा आहे. नागपुरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

राज्यात १ जानेवारी २०१९ ते २२ जानेवारी २०१९ दरम्यान आढळलेल्या एकूण २६२ रुग्णांपैकी सर्वाधिक १५१ रुग्ण हे पुणे विभागातील आहेत. यातील पुणे शहरातील ११७ जणांचा समावेश असून येथे एकही मृत्यू नाही. मुंबई विभागात ४३, ठाणे विभागात ३, नाशिक विभागात ६, औरंगाबाद विभागात २, लातूर विभागात १०, अकोला विभागात २ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. नागपूर विभागात २२ रुग्णांची नोंद असून उपचारादरम्यान पाच जण दगावले आहेत. सर्वाधिक चार मृत्यू हे नागपूर जिल्ह्य़ातील असून त्यातील तिघे नागपूर शहरातील रहिवासी आहेत. मृत एक रुग्ण अमरावती जिल्ह्य़ातील आहे.

आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये सध्या या आजाराचे १७ रुग्ण दाखल आहेत. लातूर विभागात २, अकोला विभागात १, मुंबईत १, ठाणे विभागात २, पुणे विभागात ९, कोल्हापूर विभागात ६, नाशिक विभागात दोन रुग्ण दाखल आहेत.

नागरिकांनो, काळजी घ्या!

दिवसा उन्ह-सायंकाळी थंडी अशा बदलत्या वातावरणामुळे राज्याच्या काही भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वत्र आवश्यक औषध उपलब्ध आहेत. नागरिकांनीही स्वाइन फ्लूचे लक्षण आढळताच जवळच्या रुग्णालयांत वेळीच उपचार घ्यावा. आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.

– डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक (मलेरिया, फायलेरिया), सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे.