• सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम
  • सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. यज्ञेश ठाकर यांचे मत
  • लोकसत्ताकार्यालयाला सदिच्छा भेट

ज्या प्रमाणात‘स्वाइन फ्लू’चे संशयित रुग्ण आढळून येतात, त्या तुलनेत नमुने तपासणीच्या सुविधा कमी आहेत. त्यामुळे सरकारने केवळ अत्यवस्थ रुग्णांच्याच तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पद्धतीनेच काम सुरू राहिल्यास रुग्णांची अचूक आकडेवारी मिळणे अशक्य आहे, असे मत इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्ट संघटनेचे राज्याचे माजी अध्यक्ष आणि सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. यज्ञेश ठाकर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.

नागपूर आणि देशाच्या विविध भागात २००९ पासून स्वाईन फ्लूचा प्रकोप होत आहे. इतर तापाच्या (फ्लू) तुलनेत स्वाइन फ्लूचे एच- १, एन- १ हे विषाणू कमी धोकादायक आहेत, परंतु इतर तापाचे विषाणू हे माणसापासून माणसात किंवा पक्षी व प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. मात्र, स्वाईन फ्लूचे विषाणू हे माणसापासून प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये तर डुक्कर, प्राणी, पक्ष्यांपासून माणसातही पसरतात. त्यामुळे याची लागण वेगाने होते. हल्ली नागपूरसह देशाच्या इतरही भागात या तापाचे रुग्ण वाढण्यालाही हेच कारण आहे. या रुग्ण संख्येच्या तुलनेत त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी सुविधा विदर्भ किंवा राज्यात अपुऱ्या आहेत. नागपूरमध्ये मेयो इस्पितळ आणि एका खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेतच या तपासणीची सोय आहे. मेयोत प्रत्येक दिवसाला केवळ २६ नमुने तपासता येतात. मेडिकल आणि मेयोमध्ये दाखल संशयित रुग्णांची संख्या त्याहून अधिक असेल तर तपासणीसाठी विलंब होतो. विदर्भातील एकमात्र खासगी प्रयोगशाळेवरही तपासणीचा भार अधिक आहे. तेथेही अहवाल प्राप्त व्हायला दोन ते तीन दिवस लागतात. या तपासणीची अपुरी सुविधा बघता आजही शहरातून मोठय़ा प्रमाणावर नमुने विमानाने मुंबई, पुणे आणि इतर मोठय़ा शहरात पाठवले जातात.

सरसकट सर्व संशयितांची स्वाइन फ्लू तपासणी शक्य नसल्यामुळे शासनाने मधुमेह, मूत्रपिंड, हृदय, यकृत, गर्भवती, प्रसूत महिलांसह अत्यवस्थ रुग्णांच्याच तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची तपासणी होत नाही. परिणामी, सरकारकडे सध्या केवळ गंभीर रुग्णांचीच आकडेवारी आहे. ती केंद्र सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवली जाते. वास्तविक शासनाने तपासणीचे शुल्क कमी करून सर्व संशयितांची तपासणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. यज्ञेश ठाकर म्हणाले.

तपासणी अहवालात ५ टक्के बदल शक्य

स्वाईन फ्लू तपासणीकरिता नमुने पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. ४८ तासात नमुने तपासायचे झाल्यास ते उणे ४ डिग्री सेल्सियसमध्ये तापमानात ठेवायला हवे तरच अहवाल अचूक येतो. ५ टक्के रुग्णांच्या तपासणी अहवालात काही बदल किंवा त्रुटी राहण्याची शक्यता असते. त्याला नैसर्गिक व तांत्रिक कारणे जबाबदार आहेत. या रुग्णांना हाताळणाऱ्या डॉक्टरपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने वारंवार हात स्वच्छ धुणे, प्रतिबंधक लस टोचणे यासह इतरही काळजी घेतल्यास त्यांना लागण होण्याची शक्यता कमी असते, असे डॉ. ठाकर म्हणाले.

..तर तपासणी शुल्क निम्मे होईल

नागपूरच्या एकमेव खासगी पॅथॉलॉजीमध्ये किंवा मुंबई वा इतरत्र स्वाईन फ्लूचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यास ४ हजार रुपये शुल्क आकारले जाते. यासाठी लागणारी विदेशी किट व वाहतूक खर्च यामुळे शुल्क अधिक आहे. वास्तविक सरकारने भारतीय बनावटीच्या किटला मंजुरी दिली आहे. त्याद्वारे तपासणी झाल्यास हा खर्च निम्मा कमी होऊ शकतो, परंतु सध्या या किट्स मुंबई, पुणे येथेच उपलब्ध आहेत. विदर्भात नाही, असे डॉ. ठाकर यांनी सांगितले.

प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी व्हावी

राज्याच्या सर्वच भागात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या फक्त मेयोत रक्त नमुन्यांची तपासणी केली जाते. यासाठी तेथे दाखल रुग्णांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर इतरांच्या तपासण्या होतात. त्यामुळे त्याला विलंब होतो. ही समस्या कायम सोडवण्याकरिता शासनाने प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी सुविधा उपलब्ध करावी. अनेकदा तपासणीपूर्वीच संशयित रुग्णांवर स्वाईन फ्लूचे उपचार केले जातात, याकडेही ठाकर यांनी लक्ष वेधले.