विलगीकरण केंद्रातील अधिकारी त्रासले

नागपूर : मरकजहून परतलेल्या व सक्तीच्या विलगीकरणात असलेल्या अनेकांकडून  बिर्याणीसोबतच अजब मागण्या केल्या जात असल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत. लोणाऱ्यातील वसतिगृहात या विषयावर सोमवारी गोंधळ घातला गेला  तर आमदार निवासासह इतर ठिकाणच्या मरकजशी संबंधित व्यक्तींकडून नियमबाह्य़ मुक्त संचार सुय असल्याने विलगीकरणातील इतरांना प्रचंड मन:स्ताप होत  आहे.

मरकजच्या यादीतील नागपूरसह जवळपासच्या भागातील ७० जणांना आमदार निवासात, ३५ जणांना वनामती, ५० जणांना रविभवन, ६८ जणांना लोणारातील एका वसतिगृहात सक्तीच्या विलगीकरणात ठेवले आहे. त्यांना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी करोनाचे धोकेही सांगितले, खोलीत सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले. त्यानंतरही आमदार निवासासह इतर काही भागात हे व्यक्ती कुणाचे ऐकायला तयार नसून ते घोळक्याने मुक्त संचार करत आहेत. दक्षिण अफ्रिकेच्या शेजारील देशातून आलेला एक जण येथे विलगीकरणात आहे. येथे मरकजहून परतलेल्यांचा मन:स्ताप बघून त्याच्यासह अनेकांनी सोमवारी थेट महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली. महापालिका अधिकाऱ्यांनी हा विषय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिला आहे. त्यामुळे आतातरी  येथे  नियमांची सक्ती होणार काय? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान लोणारातील वसतिगृहात असलेल्यांनी सोमवारी गोंधळ घालत जेवणात बिर्याणीची मागणी केली. सगळ्यांना जेवण्याचा समान नियमानुसार शाकाहारी अन्न दिले जात असल्याने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे अधिकारी सांगितले. पण, कुणी ऐकायला तयार नव्हते. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर त्याला दुजोरा दिला.

मरकजच्या यादीतही गोंधळ

मरकजच्या नावाने विलगीकरणासाठी  आणलेल्यांत विविध धर्माचे लोक आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने काहींना चुकीने उचलून आणले होते. परंतु चूक लक्षात आल्यावर काहींना परत सोडल्याची सूत्रांची माहिती आहे. पुन्हा हा प्रकार इतरांसोबत घडू नये म्हणून विशिष्ट काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.