८० किमीचा प्रवास करीत उमरेड-कऱ्हांडला क्षेत्रास पसंती 

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघाने सुमारे ८० किलोमीटरचे अंतर पार करत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य गाठले आहे. या व्याघ्रप्रकल्पातून आतापर्यंत तीन ते चार वाघांनी उमरेड-कऱ्हांडलामध्ये प्रवेश केल्यामुळे ताडोबा ते उमरेड हे वाघांसाठी एक संरक्षित क्षेत्र म्हणून समोर येत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढत असून गेल्या काही वर्षांत या व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित होणाऱ्या वाघांची संख्या वाढली आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एक वाघ एका वन्यजीवप्रेमीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. तो पाहताक्षणी ताडोबातील ‘माया’ या वाघिणीचा बछडा असल्याचे लक्षात आले. निखिल अभ्यंकर यांना हे छायाचित्र मिळताच त्यांनी तातडीने ताडोबातील त्याचे छायाचित्र तपासले. हे दोन्ही छायाचित्र तपासल्यानंतर वाघाच्या भुवयांवरील पट्टे जुळले. वन्यजीव अभ्यासकांकडून शुक्रवारी सायंकाळी हा तोच वाघ असल्याचे स्पष्ट झाले. तरीही वनखात्याकडून यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब व्हायचे आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून गेल्या वर्षी दोन वाघ स्थलांतरित झाले होते. यावर्षी कोळसा वनक्षेत्रातून दोन वाघ स्थलांतरित झाले आहेत. खडसंगी बफर क्षेत्रातून एका वाघाचे स्थलांतर झाले आहे. विशेष म्हणजे, अतिशय कमी कालावधीत हे वाघ स्थलांतरित झाले आहेत. कोळसा वनक्षेत्रातून वाघ सातत्याने बाहेर पडत आहेत. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जाण्यासाठी वाघांनी चिमूर, भिसी, घोडाझरी असा मार्ग पत्करला आहे. या अभयारण्यात आलेल्या काही वाघांनी काही कालावधीनंतर नवेगाव-नागझिरा व इतर अभयारण्याचा मार्ग स्वीकारला हे देखील तेवढेच खरे आहे.

खात्रीनंतरच.. : जानेवारी २०१७ मध्ये स्थलांतरित झालेल्या या बछडय़ाला ताडोबात पाहण्यात आले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघ येत आहेत, याचाच अर्थ वाघांना हे सुरक्षित क्षेत्र असल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे या क्षेत्राची सुरक्षा अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असे मत वन्यजीवप्रेमी निखिल अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ ही वाघीण मध्य भारतात प्रसिद्ध आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरित झालेला ‘सूर्या’ हा बछडा तिचाच असून ‘मीरा’ नावाचा बछडा देखील तिचाच होता. अलीकडेच रानगव्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.