गणेश विसर्जनावर कर लागणार

गणेशोत्सव संपला असला तरीही गणेश विसर्जनातून तलावांचे झालेले प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी यातून निर्माण झालेले प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. तलावातील पाण्याचे प्रदूषण आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावर आता पर्यावरणवाद्यांनीच पर्याय शोधला आहे. ‘गणपती विसर्जनावर कर’ असा हा प्रस्ताव असून महानगरपालिकेपुढे अजून सादर व्हायचा आहे. मात्र, प्रस्ताव सादर झाल्यानंतर महानगरपालिकेने तो लागू केला तर तलावातील पाण्याचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास या दोन्ही बाबींना आळा निश्चितच बसणार आहे.

दरवर्षी शहरातील तलावांमध्ये लाखोंच्या संख्येने गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते. कृत्रिम तलावांचा पर्याय गेल्या काही वर्षांत समोर आला असला तरी लोकांनी पूर्णपणे तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे घरगती गणपतीसह दहा ते वीस फूट उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती तलावात जातात. त्यामुळे तलावातील पाण्याचे प्रदूषण, मास्यांचा मृत्यू आणि पर्यावरणाची हानी या तिन्ही बाबींना सामोरे जावे लागते. त्यावर आता ईको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशनचे विजय लिमये यांनी अतिशय चांगला पर्याय शोधला आहे. ‘गणपती विसर्जनावर कर’ अशी नवी संकल्पना त्यांनी तयार केली असून लवकरच तसा प्रस्ताव महापौरांकडे जाणार आहे. एका फुटाला पाचशे रुपये याप्रमाणे गणेश मंडळ तसेच घरगुती गणेशांच्या मूर्तीसाठी पैसे आकारले जातील. गणपतीची स्थापना करतानाच मंडळाला ते पैसे महानगरपालिकेकडे जमा करावे लागतील. महापालिका त्यांना भरलेल्या पैशाची पावती देईल आणि विसर्जनाच्यावेळी पावती दाखवल्यानंतरच त्यांना तलावात मूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात येईल.

लिमये यांची ही संकल्पना महापालिकेने प्रत्यक्षात आणल्यास एकाचवेळी अनेक बाबी साध्य करता येणार आहेत. त्यातून कोटय़वधींचा निधी महापालिकेकडे जमा होऊ शकतो. या जमा झालेल्या पैशातून गणपती विसर्जनानंतर तलावांची स्वच्छता करता येईल आणि उरलेल्या अध्र्या पैशातून तलावांचे सौंदर्यीकरण करता येईल.

यावर्षी शहरात सार्वजनिक आणि घरगुती गणपती मिळून तब्बल १ लाख ३६ हजार गणपतींची स्थापना झाली. कृत्रिम तलावाचा यावर्षी मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार झाला असला तरीदेखील ८५ टक्के गणेशमूर्ती तलावात आणि १५ टक्के गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. यातील अनेक मूर्ती या दहा फुटांच्या वर होत्या. त्यामुळे तलावातील पाण्याच्या प्रदूषणातही वाढ झाली. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही त्यांच्या वार्डात चक्क २२ फुटांच्या गणपतीची स्थापना केली. त्यामुळे आमदारांकडूनच असा प्रकार घडत असल्यास इतर मंडळांकडून अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे लिमये यांचा पर्याय त्यावर उपायकारक ठरू शकतो. गणपती विसर्जनावर फुटांप्रमाणे कर लावल्यास गणेशोत्सव मंडळ स्थापना करताना निश्चितच मूर्तीच्या उंचीचा विचार करतील. पर्यायाने तलावातील पाण्याचे प्रदूषण, मास्यांचा मृत्यू आणि पर्यावरणाचा ऱ्हास या तिन्ही बाबींना आळा बसू शकेल.