निवासस्थान, नवीन कार्यालयांसाठी ४१७ कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सकारात्मक स्थित्यंतर

राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पोलीस विभागाचे आधुनिकीकरण व पोलिसांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी तिजोरी मोकळी करण्यात आली आहे. यातून उपराजधानीतील पोलीस कल्याणाच्या उपक्रमांनी मोठी उंची गाठली आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये उपराजधानीतील पोलिसांकरिता निवासी संकुलापासून ते कार्यालये बांधणीपर्यंत भाजप सरकारने ४१७ कोटी रुपये मंजूर केले. इतिहासात प्रथमच इतका मोठा निधी नागपूर पोलिसांसाठी उपलब्ध झाला आहे.

पोलिसांच्या कामाच्या ठिकाणापासून ते निवासी संकुलांपर्यंत असुविधांचे साम्राज्य आहे. त्यामुळे पोलिसांकरिता चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी या विभागाला कायमच सापत्न वागणूक दिली.

मात्र, भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृहविभाग ठेवला व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विशेष आर्थिक नियोजन केले. मुख्यमंत्र्यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात पोलीस ठाण्यांची दुरुस्ती, नवीन पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम,नवीन पोलीस आयुक्त व उपायुक्त कार्यालये आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलांच्या बांधकामांकरिता सरकारने आतापर्यंत ४१७ कोटी रुपये मंजूर केले. आतापर्यंतच्या इतिहासात मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे.

८६५ नवीन निवासी संकुल

हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत कान्होलीबारा व गुमगाव परिसरात पोलीस अधिकाऱ्यांचे ९ आणि कर्मचाऱ्यांचे ३२ पोलीस निवासी संकुल बांधण्यात येत आहेत. पाचपावली पोलीस ठाण्याच्या पाठीमागे अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ५६ कोटी ५२ लाख ३९ हजार ४५२ रुपये खर्च करून १९६ निवासी संकुल बांधण्यात येत असून ६१ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात १४४ कोटी रुपये खर्च करून ३४८ निवासी संकुल बांधण्यात येत असून पोलीस मुख्यालयाच्या परिसरात १०० कोटी ७ लाख ४८ हजार ६०८ रुपये खर्च करून २८० निवासी संकुल बांधण्यात येत आहेत. त्यापैकी ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या कार्यालयांसाठी मिळाला कोटय़वधींचा निधी

परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त कार्यालय, लकडगंज येथे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामांसाठी कोटय़वधीचा निधी मंजूर करण्यात आला. याशिवाय नंदनवन पोलीस ठाणे, हिंगणा पोलीस ठाणे, बजाजनगर पोलीस ठाण्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याचे बांधकाम ३८ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे.

पोलिसांचे मनोबल उंचावले

सरकारने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर केला आहे. चांगले निवासस्थान बांधून देण्यापासून ते कामाच्या ठिकाणचा दर्जा उंचावण्यासाठी कोटय़वधी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांचे मनोबल उंचावले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम कामांमध्ये दिसून येत असून कामाची गुणवत्ताची उंचावली आहे.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय,  पोलीस आयुक्त