जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सरासरी ४६ हजार लिटर देशी दारुचा खप

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : दोन महिने उद्योग-व्यवसाय बंद असल्याने आलेली बेरोजगारी, वेतन कपातीचा फटका आणि तत्सम कारणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीमुळे  ग्रामीण भागात नैराश्याचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्य़ात रोज सरासरी ४० ते ४६ हजार लिटर देशी दारू विकली जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आकडे दर्शवतात. आर्थिक हलाखीच्या काळातील या उलाढालीबाबत सामाजिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

करोनामुळे संपूर्ण देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून नागपूर जिल्हाही सुटला नाही. टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून येथील बंद झालेले उद्योग-व्यवसाय आणि छोटी मोठी दुकाने अजूनही पूर्णपणे सुरू झाली नाहीत. ठप्प झालेल्या उलाढालीमुळे हजारो लोकांचे रोजगार गेले. रोजंदारी कामगारांची संख्या यात मोठय़ा संख्येने आहे. पुन्हा कधी हाताला काम मिळेल याची अनिश्चतता मोठी आहे. दुसरीकडे ज्याच्या नोकऱ्या कायम आहेत त्यांच्यावर वेतन कपातीची आणि पुढच्या काळात रोजगार जाण्याची भीती आहे. उन्हाळा असल्याने खेडय़ात शेतीचीही कामे बंद, बाजार बंद असल्याने धान्यविक्री ठप्प असे सार्वत्रिक चित्र आहे.

अशा स्थितीत राज्य शासनाने १५ मेपासून जिल्ह्य़ात मद्यविक्री सुरू केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  १५ मे ते १ जून  या १८ दिवसात जिल्ह्य़ात तब्बल  एकूण ८ लाख ३० हजार ८२४ लिटरची विक्री झाली. रोजच्या विक्रीचे प्रमाण सरासरी  ४६ हजार १५९ लिटर आहे. विशेष म्हणजे, हे सर्व व्यवहार रोखीतील आहे. ग्रामीण भागात विदेशीच्या तुलनेत देशीला मागणी अधिक असून हे मद्य पिणाऱ्यांमध्ये मजूर, कामगारांचा समावेश अधिक आहे. एकीकडे हाताला काम नाही आणि दुसरीकडे रोज  हजारो लिटर्सची होणारी मद्यविक्री आश्चर्यकारक मानली

जात आहे.

मद्यविक्री सुरू करताना जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ग्रामीणमध्येच देशीदारू विक्रीची परवानगी दिली. दुसऱ्याच दिवशी शहरालगतच्या भागातील दुकाने बंद करून तेथे घरपोच विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीणचे क्षेत्र कमी झाले. त्यानंतरही विक्रीचे आकडे थक्क करणारे आहेत. विक्री सुरू झाल्यावर पहिल्या पाच दिवसात १५ ते२० मे दरम्यान दररोजची ५० ते ६० हजार लिटर्स, त्यानंतरच्या अकरा दिवसात २१ मे ते १ जून या दरम्यान फक्त तीन दिवसाचा अपवाद सोडला तर उर्वरित दिवसात ती ४० ते ४५ हजार लिटर्स इतकी दारू विकली गेली.

नैराश्यात जास्त मद्य सेवन

यासंदर्भात ज्येष्ठ कामगार नेते व अभ्यासक हरीश धुरट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, देशी मद्याचे सेवन करणारे  रोजंदार कामगार अधिक असतात. यापैकी अनेक जणांना व्यसन जडलेले असते. काम नसल्याच्या नैराश्येतून ते मद्य सेवन करीत असावे. देशात अनेक ठिकाणी कामगारांनी अधिक काम करावे म्हणून कधी जास्त पैशांचे तर कधी मद्याचे आमिष दाखवले जाते. या आमिषातूनही अनेकांना मद्यप्राशनाचे व्यसन लागले आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील मद्यविक्री

*  १५ मे (५८,५०४ लि.)

*  १६ मे (५९८१६ लि)

*  १७ मे (६०,६०७ लि)

*  १८ मे (५४,५४७ लि)

*  १९ मे (५३,९५५ लि)

*  २० मे (५१,२५२ लि)

*  २१ मे(४५,८०९ लि)

*  २२मे (४३,३५५ लि)

*   २३ मे (४६,९६५ लि)