चिकन सेंटरवर लुटपाट करून विरोध करणाऱ्यांच्या मागे चाकू घेऊन धावणाऱ्या चौघांचा पाठलाग करून वाहतूक पोलिसाने एकाचा जीव वाचविला. वाहतूक पोलिसाला बघून इतर आरोपी पळून गेले. वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका मोठी घटना टळल्याची चर्चा सर्व पोलीस दलात आहे. पंकज रामटेके असे जिगरबाज शिपायाचे नाव असून तो वाहतूक विभागाच्या पूर्व शाखेत कार्यरत आहे.

शुक्रवारी दुपारी १४.१५ वाजताच्या सुमारास पंकज हे शताब्दी चौकात कर्तव्यावर होते. त्याचवेळी काशीनगर रिंगरोड येथील बुद्धराम कलेश्वर कैथवार (४०) यांच्या चिकनच्या दुकानात चारजन शिरले आणि त्यांनी लाकडी दांडा व चाकूच्या जोरावर दुकान लुटले. त्यावेळी दुकानात बसलेले राजू लोखंडे आणि एका नोकराने मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपींनी चाकू काढले आणि राजूवर हल्ला केला. त्यावेळी राजू पळू लागला. आरोपींनी दुकानातील २ हजार ४०० रुपये घेऊन राजूचा पाठलाग करू लागले. काहीजन चाकू घेऊन एकाचा पाठलाग करीत असल्याचे दिसताच पंकजही त्यांच्यामागे धावला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे बघून ते पळून गेले. दरम्यान पंकजने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आरोपी पळाल्यानंतर पंकजने एक माणूस जमिनीवर पडला होता. त्याला कारण विचारले असता सर्व हकीकत समोर आली. त्यानंतर अजनी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंकजने आरोपींचे चेहरे बघितले होते. त्यामुळे अजनी पोलीस आणि पंकज यांनी एकत्रित फिरून आरोपींना अटक केली. सोनू लामसोंगे (२५), अंकुर धकाते, आदित्य ऊर्फ नव्वा लामसोंगे आणि इतर एक सर्व रा. रमानगर यांना अटक केली. या घटनेनरंतर पोलीस उपायुक्त जी. श्रीधर, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष राठोड यांनी पंकज रामटेके यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले.