13 August 2020

News Flash

रेल्वेगाडय़ांची देखभाल-दुरुस्ती आता रोबोकडून !

रोबोच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास रोबो स्वत: आपला मार्ग बदलू शकतो.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

देशातील पहिला प्रयोग नागपूर रेल्वेस्थानकावर

नागपूर : ‘रोबो’ अर्थात यंत्रमानवाचे कार्यक्षेत्र दिवसागणिक विस्तारत आहे. आता तर चक्क रेल्वेगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसारख्या कठीण कामासाठीही रोबोला तैनात केले जाणार आहे. नागपूर रेल्वेने डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हा रोबो विकसित केला असून तो गाडीच्या चाकापासून ते डब्याच्या आतील, बाहेरील कानाकोपऱ्याचे छायाचित्र आणि चित्रफिती उपलब्ध करून देणार आहे. नियंत्रण कक्षातून त्याच्यावर नियंत्रण ठेवून दुरुस्ती कामात त्याची मदत घेतली जाईल. असा प्रयोग करणारे नागपूर रेल्वेस्थानक देशातील पहिले स्थानक ठरले आहे.

विशिष्ट अंतराचा प्रवास झाल्यानंतर रेल्वेडब्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यासाठी स्थानकावर पीट लाईनची व्यवस्था असते. या पीट लाईनवर आता ‘उत्साद’ नावाचा रोबो सज्ज राहणार आहे. सध्या गाडी पीट  लाईनवर आल्यानंतर यांत्रिक विभागाचे कर्मचारी डब्यांचे नटबोल्ट तपासतात. आता हे काम रोबोच्या हवाली करण्यात आले आहे. हा रोबो रेल्वे डब्यांचे नटबोल्ट तपासण्यात कर्मचाऱ्यांना मदत करेल.

या रोबोमध्ये एचडी कॅमेरा तसेच विविध प्रकारचे सेंन्सर बसवले आहेत. रोबोमध्ये बसवलेल्या एच.डी. कॅमेऱ्यामुळे डब्याच्या आतील सुटय़ा भागांचे छायाचित्र व व्हिडीओ वाय-फायच्या माध्यमातून नियंत्रण कक्षात पाहता येतील. नियंत्रण कक्षातील अभियंते ते एॅंड्राईड अ‍ॅपच्या मदतीने नियंत्रित करतील. या कॅमेऱ्याला कोणत्याही कोनात सेट केले जाऊ शकते. तसेच प्राप्त छायाचित्र मोठे करून बघितले जाऊ शकते.

स्वत: आपला मार्ग बदलण्याचीही क्षमता

रोबोच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास रोबो स्वत: आपला मार्ग बदलू शकतो. हा रोबो गाडीच्या चाकाची स्थिती देखील सांगू शकतो. तसेच तो मॅन्युअल  मोड व ऑटो मोड तसेच ऑबस्टॅकल अव्हॉयडन्सने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. अशाप्रकारचा हा देशातील पहिला प्रयोग आहे. या रोबोचे डिझाईन व निर्माण वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता अखिलेश चौबे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 3:18 am

Web Title: train maintenance can be done now from robo
Next Stories
1 घरभाडे वसुलीसाठी महिलेवर बलात्कार
2 एटीएम कार्ड हॅक करून फसवणूक
3 तात्काळ तिकीट सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेरच
Just Now!
X