08 August 2020

News Flash

वृक्षारोपणात जगतात केवळ १० टक्के झाडे!

नागपूर शहरात दरवर्षी सामाजिक संस्था, महानगरपालिका यांच्या माध्यमातून १० ते १५ हजार झाडे लावली जातात.

पर्यावरण रक्षणाचा एक मार्ग असलेल्या वृक्षारोपणाविषयी असलेल्या माहितीच्या अभावामुळे शहरातील ९० टक्के वृक्षारोपण अपयशी ठरत असल्याची बाब समोर आली आहे. वृक्षारोपणासाठी असलेला काळ, वृक्षारोपणाची जागा, वृक्षारोपणासाठी झाडांची निवड, वृक्षारोपणानंतरची काळजी, वैज्ञानिकदृष्टय़ा होणारे वृक्षारोपण या सर्व बाबींचा अभाव आहे. विकासाच्या गर्तेत एकीकडे शहरातील हिरवळीवर कुऱ्हाड चालवली जात असतानाच, ती वाढवण्यासाठी होणाऱ्या वृक्षारोपणाची चुकीची पद्धत वृक्षारोपणाच्या अपयशासाठी कारणीभूत ठरली आहे.

नागपूर शहरात दरवर्षी सामाजिक संस्था, महानगरपालिका यांच्या माध्यमातून १० ते १५ हजार झाडे लावली जातात. त्यातील केवळ १० टक्के झाडे जगतात, तर ‘ट्री गार्ड’ अभावी ९० टक्के झाडे मृत पावतात. पर्यावरण रक्षणाविषयीची जनजागृती वृक्षारोपणासाठी कारणीभूत ठरत असतानाच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून शहरातील नागरिकांना ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. हा हेतू खरंच साध्य होतो का आणि झाला तर कितपत साध्य होतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये वृक्षारोपणासाठी पुढे सरसावतात. कधी त्यासाठी महानगरपालिकेचा आधार घेतला जातो, तर कधी स्वत:हून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला जातो. मात्र, वृक्षारोपणाच्या वैज्ञानिक पद्धतीपासून अनभिज्ञ असल्यामुळे अनेकदा हे वृक्षारोपण अयशस्वी ठरले आहे. वृक्षारोपणादरम्यान लावली जाणारी झाडे खरोखरच पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका पार पाडतात का, हे कुणीही विचारात घेत नाही. वातावरणातील कार्बन शोषून घेणारे आणि अधिकाधिक प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडणाऱ्या वृक्षारोपणाच्या प्रजाती यादरम्यान लावल्या तरच पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून शहराला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासोबतच ज्याठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे, त्या जागेवरील मातीत कोणती झाडे जगू शकतात याचा समतोल साधता आला तरच ते वृक्षारोपण यशस्वी ठरू शकते. वृक्षारोपणासाठी २५ रुपयाचे रोपटे घेऊन येणारे अनेकजण आहेत, पण लावलेल्या रोपटय़ाच्या रक्षणाकरिता लागणारे किमान ५०० ते ८०० रुपये किमतीचे ट्री गार्ड देण्यासाठी पुढे येणाऱ्या हातांचे प्रमाण अतिशय कमी आहे. रोपटय़ांसोबतच ‘ट्री गार्ड’ देणारे हात वाढले तर शहरातील हिरवळीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

९० टक्के वृक्षारोपण अयशस्वी होण्यामागे ‘ट्री गार्ड’ हे एक कारण असले तरीही वृक्षारोपणाच्या वैज्ञानिक पद्धतीचा अभावदेखील त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे, पण माहितीचा अभावही आहे. सामान्य माणूस हा वृक्षारोपणातील तज्ज्ञ नाही, त्यामुळे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वैज्ञानिकरित्या वृक्षारोपणाचे धडे दिले तर झाडे जगण्याचे प्रमाण वाढेल. मान्सून आणि मान्सून दरम्यानच्या काळात वृक्षारोपण झाले. तसेच एक फूटाहून अधिक उंचीची झाडे वृक्षारोपणादरम्यान लावली गेली तर त्यांच्या जगण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्षारोपण करायचे म्हणून नव्हे तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून ते झाले पाहिजे.

-कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजिल फाउंडेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 4:28 am

Web Title: tree plantation
टॅग Nagpur
Next Stories
1 रेल्वे स्थानकावर सौरऊर्जा प्रकल्प
2 तोडलेल्या झाडांच्या पाचपट लागवड
3 राज्य वन्यजीव मंडळाला गांभीर्याचे वावडे
Just Now!
X