दुपारी १२ नंतर रस्त्यांवर वर्दळ कमी

कडक उन्हामुळे उपराजधानीच्या रस्त्यांवर जणू अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. दुपारी १२ नंतर टाचणी पडली तरी आवाज येऊ नये, अशी अवस्था शहरातील अनेक रस्त्यांची झाली आहे.

मे महिन्यात पोहोचणाऱ्या उष्णतेच्या झळा आता एप्रिलमध्येच जाणवायला लागल्या आहेत. उपराजधानी ही तशी हिरवळीसाठी ओळखली जात होती. कधीकाळी याच उपराजधानीत तापमानाचा पारा दुपारी चढला तरीही सायंकाळी गार वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळत होती. आता हिरवळीऐवजी सिमेंटचे जंगल वाढत चालले आहे.

रात्री थंड होणाऱ्या या शहरात आता २४ तास उकडायला लागले आहे. बाहेर पडल्याशिवाय पोटाची खळगी भरली जात नाही. त्यामुळे ४५ अंश सेल्सिअसमध्येही नागपूरकर नोकरदार बाहेर पडत आहेत. चारचाकी वाहनधारकांना ही झळ फारशी पोहचत नाही.

दुचाकी वाहनधारक मात्र वाहतूक दिव्यांच्या ठिकाणी जिथेकुठे सावली मिळाली त्याठिकाणी थांबून अर्धा मिनिट का होईला उन्हापासून बचावाचा प्रयत्न करताना दिसतात. शरीराचा दाह कमी करायसाठी अनेक जण ऊसाचा रस, लिंबू पाण्याचा आधार घेताना दिसतात.

३० एप्रिलपर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटा

नागपूरसह विदर्भातील सात जिल्हे उन्हाच्या तडाख्यात सापडले आहेत. हवामान खात्याने २६ ते ३० एप्रिलपर्यंत  उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. पूर्वमोसमी पावसाचा परिणाम आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यत तापमान ४० अंश सेल्सिअसवरून ४५ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळसह वाशीम जिल्ह्यला तीव्र उष्णतेच्या लाटेच्या झळा पोहोचणार आहेत. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया  या जिल्ह्यत मात्र सध्यातरी उष्णतेच्या लाटा नाहीत. या पाच दिवसात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.

विक्रम मोडीत निघण्याची भीती

नागपुरात २६ मे १९५४ मध्ये मेयो येथील केंद्रात ४७.५ तर सोनेगाव येथील केंद्रात ४७.८ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर २२ मे २०१३ मध्ये ४७.९ अंश सेल्सिअस आणि २० मे २०१६ ला ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. हा विक्रम यंदा मोडीत निघणार का, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे.