महेश बोकडे

शासकीय रुग्णालयांच्या करोना उपचार कक्षांमध्ये दाखल रुग्णांपैकी कुणाला रेमडेसिवीर हवे आहे, तर कुणाला ‘एचसीक्यू’. अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे देताना पाहून कुणाला पालेभाज्यांचा रस हवा आहे, तर कुणाला लसणाचा अर्क. अमुक एका संशोधनात रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारच योग्य  म्हटल्याने काहींना हाच उपचार हवा आहे. रुग्णच नवनवी औषधे आणि उपचार पद्धती सुचवू लागल्याने उपचार करणारे डॉक्टर वैतागले आहेत.

नागपुरात दररोज मोठय़ा संख्येने करोनाबाधित सरकारी रुग्णालय, मेयो, एम्सच्या कोविड कक्षांत दाखल होत आहेत. यात आंतरजाल (इंटरनेट) हाताळण्यात प्रावीण्य असलेले काही रुग्ण दिवसभर रुग्णालयात भ्रमणध्वनीवर करोनाबाबतची माहिती वाचत असतात. त्यात करोनावरील नवीन औषधांसह उपचाराच्या पद्धतींचेही वाचन करून ते डॉक्टरांकडे त्यानुसार उपचाराचा आग्रह धरतात. इंटरनेटवरील माहिती परस्परविरोधी आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांची समजूत घालताना डॉक्टरांच्याही नाकीनऊ येत आहे.

अमरावतीहून नागपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल एका रुग्णाच्या बाबतीत असेच घडले. त्याने देश-विदेशातील वैद्यक क्षेत्रातील त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. त्याला रक्तद्रव उपचाराची (प्लाझ्मा थेरपी) माहिती कळल्यावर त्याने त्याचा आग्रह धरला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात या उपचार पद्धतीचे उद्घाटन झाले होते. त्यानुसार या रुग्णावर रक्तद्रव उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याने पहिल्या दिवशी ते स्वीकारले. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा भ्रमणध्वनीवरील माहिती वाचून आणि इतरांशी सल्लामसलत करून त्याने रक्तद्रव उपचार मध्येच सोडून दिला.

दुसऱ्या एका प्रकरणात एका रुग्णाने एका औषधाबाबत जास्तच वाचन केले होते. त्यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडे ते वाचलेले औषध देण्याचा आग्रह धरला. हे औषध सध्या नागपुरात उपलब्ध नाही. शिवाय त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांत दोन मतप्रवाह आहेत. त्यानंतर या रुग्णाची समजूत काढण्यात डॉक्टरांना आपली बरीच ऊर्जा खर्च करावी लागली.

माहितीच्या महापुरात रुग्ण

रुग्णांनीच डॉक्टरांना औषधे आणि उपचार पद्धती सुचवण्याचे हे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. सुरुवातीला करोनाबाबत फारशी माहिती संकेतस्थळांवर नव्हती. त्यामुळे रुग्ण शांतपणे उपचार घेत होते. आता संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवर करोना माहितीचा महापूर आला आहे. त्यात रुग्ण वाहत जात असून त्यांना या माहितीपासून कसे दूर ठेवायचे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे आहे.

काही रुग्ण भ्रमणध्वनीवरील माहितीचे वाचन करून विशिष्ट उपचाराचा आग्रह धरतात. त्यांच्या अशा अनपेक्षित आग्रहाने आम्ही पार वैतागलो आहोत. परंतु उपचारांचे व्यवस्थापन उत्कृष्ट असल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रुग्णांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवायला हवा.

– प्रा. डॉ. राजेश गोसावी, प्रमुख, औषधशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय