तासभर रांगेत उभे राहून अनेक युवक परतले; जिल्ह्यात ४२ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण

लसीकरण आकडयात : * शहर २३ हजार ७०३ * ग्रामीण १८ हजार १८

नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून १८ ते ४४ या वयोगटासाठी बंद असलेले लसीकरण अखेर आज बुधवारी शहरात सुरू झाले. लसीकरण केंद्रही वाढवण्यात आले. परंतु, पुरवठाच ठप्प असल्याने अनेक युवक  व ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करूनही आणि तासभर रांगेत उभे राहूनही परत जावे लागले. शहरात आज सर्वाधिक २३ हजार ७०३ नागरिकांनी लसीकरणाची मात्रा घेतली. त्यात महापालिका व शासकीय केंद्रांवर २२ हजार २२१ तर खासगी केंद्रांवर १ हजार ४८२ नागरिकांनी लशीची मात्र घेतली.

महापालिका व शासकीय रुग्णालयाच्या १०६ केंद्रांवर लसीकरण सुरू  करण्यात आले. या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जात आहे.  पहिल्याच दिवशी तरुणांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. २० हजारपेक्षा जास्त युवकांनी लस घेतली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया येथील केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली तर आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुद्धा या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले. मात्र  अनेक केंद्रावर लसीचा पुरवठा करण्यात आला नाही.  अनेक मोठय़ा केंद्रावर १०० ते १५० लसीची मात्रा उपलब्ध होती, तर २५० ते ३०० नागरिक प्रतीक्षेत होते. त्यामुळे अनेक युवकांना लस न घेता  परत जावे लागले. नंदनवन, ओंकारनगर, दर्शन कॉलनी, या भागातील केंद्रावर दुपारी २ वाजता लस संपल्यामुळे केंद्र बंद करण्यात आले. हुडकेश्वर येथील एका लसीकरण केंद्रावर ७५ लोकांची नोंदणी केली असताना या केंद्रावर दिवसभरात दीडशेपेक्षा जास्त लोक लसीकरणासाठी आले होते. ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिली मात्रा घेतली आहे त्यांना दुसरी मात्रा  मेडिकल   व स्व.प्रभाकर दटके महाल रोग निदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.