बदलत्या समाजचित्रांचे वास्तव रूप वाचकांपर्यंत पोहोचवले; वाचकांकडूनही उत्साहात स्वागत

नागपूर : दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची वाचनीय परंपरा. गेल्या काही वर्षात दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. वाचकांना विचार पुरवणाऱ्या या दिवाळी अंकांनी अनेक चांगले-वाईट स्थित्यंतरेही अनुभवली. यातील करोनाची आपत्ती तर जगण्याचे संदर्भच आंतर्बाह्य बदलून टाकणारी ठरली. परंतु अशाही स्थितीत अनेक वाङ्मयीन संस्थांनी, साहित्यप्रेमी व्यक्तींच्या समूहांनी प्रसंगी पदरमोड करून हे शब्दधन वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यात अर्थातच विदर्भातील काही नामवंत व यंदा पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाचाही समावेश आहे. त्यांचीच ही धावती ओळख…

मीडिया वॉच

 

दिवाळी अंकातील साहित्याइतकाच महत्त्वाचा असतो तो मुखपृष्ठाचा दर्जा आणि त्यामागचा विचार. अशाच वैचारिक दर्जासह अमरावतीहून निघणाऱ्या मीडिया वॉचने यंदाही वाचकांना भुरळ घातली आहे. मनोरंजनाच्या बदलत्या विश्वाचे अंतरंग हे या अंकाचे यंदाचे वैशिष्ट्य आहे. ओटीटी या शब्दाने मनोरंजन उद्योगाचे चित्रच बदलून टाकले आहे. या बदलांचे स्वरूप नेमके कसे आहे, यावर मान्यवर लेखकांनी यात आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. याशिवाय मी आणि माझे एकटेपण या विभागात श्याम मानव, सुरेश द्वादशीवार, मिथीला सुभाष, प्रवीण बर्दापूरकर या मंडळींचे अनुभव वाचनीय आहेत. अविनाश दुधे या दिवाळी अंकाचे संपादक आहेत.

आकांक्षा

 

महिलांच्या समस्येला वाहिलेल्या आकांक्षा त्रैमासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा तब्बल २१ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. विशेषत: वैदर्भीय लेखक-लेखिकांच्या लेखांनी सजलेल्या दिवाळी अंकात विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. सुप्रिया अय्यर, मंजूषा सावरकर, प्रा. मीनल येवले, अमर हबीब, अतिमाभ पावडे, डॉ. प्रमोद मुनघाटे व त्यांच्यासारख्याच आणखी काही लेखकांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा अंक सिद्ध झाला आहे. विषयाची निवड आणि मांडणी ही या अंकाची वैशिष्ट्ये आहेत. प्रसिद्ध लेखिका अरुणा सबाने या अंकाच्या संपादिका आहेत.

देशबांधव

 

दिवाळी अंक ही समाजाशी आपली वैचारिक बांधीलकी आहे आणि जी जपण्यासाठी किती अडथळे पार करावे लागले तरी ते केले पाहिजे, असा संकल्प मनाशी बाळगून सर्व देशबांधवचा अंक वाचकांपर्यंत पोहोचला आहे. लेख, कथा, अनुभव कथन, कविता अशा सर्वच विभागांची सैर हा अंक घडवून आणतो. याशिवाय या अंकाचे एक वेगळेपण म्हणजे या अंकाच्या एका भागात हिंदी कवितांचा अनुवाददेखील आहे. मराठीतेतर भाषेत जे जे काही वाचनीय, अभिनंदनीय आहे तेही आपल्या मायबोलीत वाचकांपर्यंत पोहोचायला हवे, असा विचार करून अनुवादाचा हा धाडसी प्रकार अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय या अंकात डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अक्रम पठाण, डॉ. छाया महाजन, डॉ. श्याम मोहरकर यांचे लेखही अंतर्मुख करणारे आहेत. रवींद्र बोकारे हे या अंकाचे संपादक आहेत.

शब्दोत्सव

 

‘स्त्री- मी आणि ती’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून अमरावतीवरून यंदा पहिल्यांदाच ‘शब्दोत्सव’  दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. या अंकात उर्मिला पवार, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. मुग्धा कर्णिक, वंदना खरे, डॉ. कीर्ती पिंजरकर, अभिनेत्री विद्या बालन, खासदार नवनीत राणा, ज्ञानदा कदम आणि उर्मिला निंबाळकर यांनी आपले अनुभव मांडले आहेत. त्यासोबतच बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे समाजावर होणाऱ्या परिणामांविषयी कुमार केतकर, अमर हबीब, उत्पल व. बा. यांनी भाष्य केले आहे. देशातील सामाजिक व राजकीय स्त्री चळवळींची स्थिती व त्यांचा इतिहास, भौगोलिक संदर्भ त्याचबरोबर साहित्य, कला, रंगभूमी आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रात स्त्रियांचे योगदान अधोरेखित करणारे लेखन डॉ. अशोक राणा, डॉ. सतीश पावडे यांनी केले आहे. डॉ. यशवंत मनोहर, अजय कांडर, अशोक थोरात, डॉ. सुनील अवचार, वर्षा ढोके-सय्यद व योगिनी राऊळ इत्यादी कवींच्या लेखणीतून खुलून आलेले काव्य अंकाला मधुर लय देणारे ठरले आहे. मुखवट्यामागे स्त्रीची कशी घुसमट होते, हे ‘मास्क’ या मुखपृष्ठावरील चित्रातून दर्शवण्याचा प्रयत्न सुनील यावलीकर यांनी केला आहे, त्यामुळे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरले आहे. हा अंक वैचारिक मेजवानी देणारा आणि संग्रही ठेवावा, असाच झाला आहे. प्रीती बनारसे या अंकाच्या संपादिका आहेत.