टाळेबंदीच्या काळात मुदत संपलेल्यांना दिलासा

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : टाळेबंदीच्या काळात वाहन चालवण्याच्या कायम परवान्याची मुदत शासनाने वाढवली, परंतु शिकाऊ परवान्याची मुदत वाढवली नसल्याचे लोकसत्ताने एप्रिलमध्ये पुढे आणले होते. तांत्रिकदृष्टय़ा हे परवाने मुदतबाह्य़ झाले होते. शेवटी परिवहन विभागाने टाळेबंदीच्या काळातील शिकाऊ परवान्याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता या उमेदवारांना  थेट कायम परवाना घेता येणार आहे.

मुंबई सोडून राज्यात रोज सुमारे २० हजार शिकाऊ परवाने तर  १४ हजार कायम परवाने दिले जातात. टाळेबंदीमुळे आरटीओचे काम  पूर्णपणे बंद झाले होते. दरम्यान, शासनाने कायम परवाना आणि व्यावसायिक वाहन चालवण्याच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जून २०२० या काळात संपणार असल्यास त्यांना दिलासा देत

२० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणाऱ्या व मुदत संपणाऱ्याबद्दल काहीही निर्णय झाला नव्हता.

लोकसत्ताने हा प्रकार पुढे आणल्यावर केंद्र सरकारकडून प्रत्येक  राज्य शासनाला सूचना आल्या. त्यानुसार राज्यातील परिवहन खात्याने सर्व आरटीओंना पत्र देत कायमच्या धर्तीवर शिकाऊ परवान्यालाही मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या लक्षावधी उमेदवारांना पुन्हा शिकाऊ परवान्याची प्रक्रिया करण्याचा मन:स्ताप टळला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील लाल क्षेत्र आणि लाल क्षेत्राबाहेरील आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन चालवण्याचे कायम व शिकाऊ परवाने देण्याला शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे ही परवानगी मिळाल्यावर या उमेदवारांना परवाने घेता येणार आहे.

‘‘वाहन चालवण्याच्या कायम परवान्याच्या धर्तीवर टाळेबंदी काळात मुदत संपलेल्या शिकाऊ परवान्यालाही ३० जून २०२० पर्यंत केंद्राच्या सूचनेनुसार मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार परिवहन खात्याच्या सारथी सॉफ्टवेअरमध्येही दुरुस्ती झाली आहे.’’

– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, मुंबई.