रेल्वेच्या फलाटावर भीक मागत फिरणाऱ्या आणि आईबापांपासून दुरावलेल्या मुलांना तत्कालीन रेल्वे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंगल यांच्या रूपाने आश्रयदाता मिळाला. सिंगल यांनी प्लॅटफॉर्म शाळेच्या रूपाने त्यांच्या आयुष्याला दिशा मिळवून दिली. मात्र, रेल्वे फलाटावरचा प्रत्येकच मुलगा एवढा नशीबवान नाही, तर आजही अनेक मुले या फलाटावर भीक मागताना दिसून येतात. अशाच काही मुलांसाठी ‘वरदान’ संस्था वरदान ठरली आहे. रेल्वे फलाटावरील अशाच या निराश्रितांना उद्या, बुधवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
‘प्लॅटफॉर्म’शाळेने रेल्वे फलाटावरच्या मुलांना दिशा दिली, कारण पालकत्व नावाचा आधार त्यांच्यापासून हिरावला होता. मात्र, पालकत्व नावाचा आधार असूनही रेल्वेच्या फलाटावर आजही शेकडो मुले दिशाहीन, संघर्षग्रस्त आयुष्य जगत आहेत. पोटाची आग विझवण्यासाठी पोटच्या गोळयाला त्याच्या पालकाने भिकेला लावले. ‘वरदान आयएपीए अ‍ॅन्ड चाईल्ड वेलफेअर’ने अनेकदा त्यांना दिशा देण्याचा, मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, पण दिशाहीन भटकंतीची सवय जडलेल्या या बालकांना आणि त्यांच्या पालकांनाही ते नको आहे. या मुलांचे पालक डेऱ्यावर राहतात. दिवसभर पालकही रेल्वे फलाटावर भटकंती आणि रात्री डेऱ्यावर मुक्काम अशी त्यांच्या आयुष्याची दैनंदिनी आहे. त्यांना अनेकदा ‘प्लॅटफॉर्म’ निवासी शाळेत आणण्याचा प्रयत्न झाला तरीही ती मुले यायला तयार नाहीत. पालकांनाही मुलांचे उज्ज्वल भविष्य नको, तर पोटाची खळगी भरण्याचा तो एक मार्ग असल्याने तेसुद्धा मुलांना ‘प्लॅटफॉर्म’ शाळेत जाऊ देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळेच आता ‘वरदान’ त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना दिशा देण्याचा एक प्रयत्न करीत आहे. त्याचे पहिले पाऊल उद्या, बुधवारी उचलले जाणार आहे.

रेल्वे चाईल्ड लाईनचा वर्षपूर्ती सोहळा आज
केंद्र सरकारच्या पुढाकाराने रेल्वे व महिला बालविकास मंत्रालयाद्वारा संचालित रेल्वे चाईल्ड लाईनचा वर्षपूर्ती सोहळा बुधवार, २७ जुलैला दुपारी ४ वाजता रेल्वे खुले प्रतीक्षालय, फलाट क्रमांक एक येथे साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला रेल्वेचे ‘डीआरएम’ ब्रिजेश गुप्ता उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी रेल्वे परिसरात राहणाऱ्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे.

२२ रेल्वे स्थानकांवर उपक्रम
भारतभरात नागपूरसह २२ रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू आहे. नागपूर येथील रेल्वे चाईल्ड लाईनचे संचालन ‘वरदान आयएपीए अ‍ॅन्ड चाईल्डलाईन वेलफेअर’ या संस्थेमार्गत करण्यात येते. रेल्वेस्थानकावर विपरित परिस्थितीत अडकलेल्या बालकांसह, हरवलेल्या, पळून आलेल्या तसेच मानवी तस्करीतील ० ते १८ वयोगटातील मुलांची मदत केली जाते. वर्षभरात ३००हून अधिक बालकांना नागपूर रेल्वे चाईल्ड लाईनद्वारा मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालिका डॉ. वासंती देशपांडे व रेल्वे चाईल्ड लाईनच्या समन्वयिका गौरी शास्त्री देशपांडे यांनी केले आहे.