News Flash

यंदाच्या विदर्भरंग दिवाळी अंकातही नाविन्याच्या शोधाची परंपरा कायम

मावळतीच्या किरणांकडे सन्माननीय नजरेने बघतानाच उगवतीच्या प्रखरतेकडेही जिज्ञासेनेच बघावे लागते.

 

मावळतीच्या किरणांकडे सन्माननीय नजरेने बघतानाच उगवतीच्या प्रखरतेकडेही जिज्ञासेनेच बघावे लागते. यंदाचा विदर्भरंग दिवाळी अंक असेच सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य़ करणाऱ्या, पण दुर्लक्षित नव्या पिढीसह जुन्या पिढींच्याही कार्याला उजाळा देणारा आहे. नाविन्याच्या शोधाची परंपरा यंदाही विदर्भरंग दिवाळी अंकाने कायम ठेवली आहे.

डॉक्टर आणि रुग्णांमधील दुवा ठरलेला देवेंद्र गणवीर आणि शिक्षणाच्या आड येणाऱ्या गरिबीतून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेला खुशाल ढाक यांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलामच ठोकावे लागतील. आत्महत्येच्या वाटेला लागलेल्या शेतकऱ्यांना रोखणे कठीण, पण गेल्या पाच वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या दंतचिकित्सक डॉ. चेतन दरणे यांनी त्यांच्या गावात होऊ दिलेली नाही. डॉ. विभावरी दाणी यांची ओळख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता अशीच, पण या अंकाच्या निमित्ताने त्यांचे मेळघाटातील सेवाकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाईपासून तर वृद्धावस्थेपर्यंत नागपूरच्या भाजप कार्यालयाची धूरा सांभाळणारे आनंदराव ठवरे आणि सेवानिवृत्तीनंतर आराम करण्याचे सोडून समाजकार्यात रमलेले सुनील खरे व नारायण जांभळे या मित्रांचे कार्य या अंकाच्या निमित्ताने समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी न्यायवैद्यकशास्त्रात सुधारणा सुचवून त्या शासनाच्या गळी उतरवल्या, तर शिक्षकी पेशात असले तरीही निसर्ग विज्ञानाचे गुढ उकलून विजय घुगे यांनी पर्यावरण सेवेत स्वत:ला वाहून घेतले. वनहक्कासाठी पायपीट करून गावांना जबाबदारीचे भान देणारे विजय देठे आणि नेत्रदान चळवळीला दिशा देण्याचा स्वप्नील गावंडे यांचा प्रवासही असाच काहीसा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातील मोठय़ा हुद्याची नोकरी सोडून शेतीप्रयोगात रमणारे अमिताभ पावडे आणि पुण्यात वकिलीचे शिक्षण घेतले तरीही हेमलकसा येथे आदिवासींच्या न्यायासाठी लढणारा भामरागडचा अ‍ॅड. लालसू नोगोटी, गाडगेबाबांचा वसा घेऊन काम करणारा सागर देशमुखचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. ही सारी माणसे निस्वार्थ भावनेने काम करणारी आणि अशाच माणसांनी यावर्षीचा विदर्भरंग दिवाळी अंक नटला आहे.

उद्या विदर्भरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन

लोकसत्ता विदर्भरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवार, २७ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते लोकसत्ता कार्यालय, १९ ग्रेट नाग रोड, नागपूर येथे करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:57 am

Web Title: vidarbha rang diwali issue published tomorrow
Next Stories
1 नेत्यांचे नातेवाईक इच्छुकांच्या यादीत
2 विदर्भ वार्तापत्र : विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची कसोटी!
3 विदर्भात वैद्यकीय पदव्युत्तरच्या ३५० जागा वाढणार?
Just Now!
X